बेस्ट बसमधील ८0 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट बसमधील ८0 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद

Share This

मुंबई : बेस्ट बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपैकी ८0 टक्के कॅमेरे बंद आहेत, असा हरकतीचा मुद्दा शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मांडला. 
काही वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर बेस्ट परिवहन विभागाने बेस्टच्या बसमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही संच बसवले होते. सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, येणार्‍या बसस्टॉपबद्दल प्रवाशांना माहिती देण्यासाठी संदेशफलक लावणे, आसनांची दुरुस्ती करून त्यावर जाहिराती लावणे आदी कामांसाठी नियुक्त केलेल्या 'वर्व' कंपनीचे काम व्यवस्थित होत नाही, असा आरोप सामंत यांनी केला.

८0 टक्के कॅमेरे बंद असून, चार हजार बसेसमधील ११00 आसनांचीच दुरुस्ती करण्यात आली आहे, तर अनेक बसगाड्यांतील आसनांची दुरवस्था झाली असल्याने त्याचा त्रास प्रवाशांना होतो. कैझन घोटाळ्या प्रकरणी बेस्टने आठ अधिकार्‍यांचे निलंबन केले होते. त्यापैकी दोन अधिकारी 'वर्व' कंपनीत संचालक पदावर आहेत आणि 'वर्व' कंपनी त्यांना दरमहा एक लाख रुपये मानधन देत आहे, असा आरोपही सामंत यांनी केला. या प्रकरणांत बेस्टच्या अधिकार्‍यांचेही संगनमत आहे, असेही ते म्हणाले. या कंपनीचे काम बेस्ट परिवहन विभागासाठी समाधानकारक होत नसल्यास या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणीही सामंत यांनी केली. यावर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages