मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेने सन 2010 पासून कारपेट एरियावर चुकीच्या पद्धतीने मालमत्ता कराचे वसूल केलेले 1200 कोटी रुपये मुंबईकर जनतेला आता परत करावे लागणार आहेत अशी माहिती भाजपाचे गट नेते मनोज कोटक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई महानगर पालिकेने मालमत्ता कराबाबत एक प्रस्ताव स्थायी समितीपुढे जून 2014 मधे आणला होता. या प्रस्तावानुसार कारपेट एरियावर 1.20 गुनांकानुसार कर आकारला जाणार होता. या प्रस्तावानुसार मुंबईकर जनतेला मालमत्ता करासाठी 700 कोटी रूपये जास्त कर द्यावा लागला असता. या प्रस्तावाला स्थायी समिती सद्स्यानी विरोध केला होता. परंतू याबाबत न्यायालयात प्रकरण गेल्यावर न्यायालयाने पालिकेच्या कर वसूलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर पालिकेने आता कारपेट एरिया ऐवजी बिल्टअप एरियावर 1 गुणांकानुसार मालमत्ता कर वसूल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समिति समोर सादर केला जाणार आहे. या नव्या प्रस्तावा नुसार आता मुंबईकर जनतेचे 550 कोटी रूपये वाचणार आहेत. तसेच पालिकेने मुंबईकर जनतेकडून चुकीच्या पद्धतीने वसूल केलेले 1200 कोटी रुपये जनतेला आता परत करावे लागतील असे कोटक यांनी सांगीतले.