मुंबई : मेक इन महाराष्ट्राच्या निव्वळ घोषणा होत असतील आणि समाजात जर सर्व धर्मियांना स्थान नसेल तर असा आर्थिक विकास करून आपण काय साधणार आहात असा जळजळीत सवाल करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पानसरेंच्या हत्येच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. पानसरेंच्या मारेकऱ्यांमध्ये देशाला तोडणारा विद्वेषक विचार आहे, असा आरोपही त्यांनी केला.या सरकारने कुंभ मेळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी सीसीटीव्ही भाड्याने घेतल्याचा उल्लेख करत सरकारने आता सुरक्षा व्यवस्थासुद्धा भाड्याने दिली आहे काय? असा सणसणीत टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
राज्यात माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि त्या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात पोलीसांना आणि राज्य सरकारला आलेले अपयश या विषयावर विरोधी पक्षांद्वारे आयोजित केलेल्या चर्चेत बोलताना त्यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की, आज समाजातला प्रत्येक घटक स्वत:ला असुरक्षित समजू लागला आहे. ही बाब सरकारला निश्चितच भुषणावह नाही. राज्यात दरोडे, हत्या, महिला अत्याचार असो किंवा दलित अत्याचाराच्या घटना असोत असा एकही गुन्ह्याचा प्रकार नाही ज्यात वाढ झालेली नाही, असेही ते म्हणाले.
कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा उल्लेख करताना ते म्हणाले की, पानसरेंची हत्या होणे म्हणजे पुरोगामी विचारांना मुठमाती देण्यासारखे आहे. हे प्रकरण सरकारकडून अतिशय असंवेदनशीलतेने हाताळले जात आहे. पानसरेंच्या मारेकऱ्यांमध्ये देशाला तोडणारा विद्वेषक विचार आहे. आपल्या सहकारी पक्षानेही पानसरेंच्या हत्येबाबत आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, त्याला काय उत्तर आपण देणार आहात, असा सवाल करत त्यांनी आता तरी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री देणार का?याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडेच विचारणा केली. केंद्रात गेल्या काही काळापासून "अनलॉफुल अॅक्टीव्हिटी अॅक्ट' हे विधेयक मंजुरीविना पडून आहे. त्याच्या मंजुरीसाठी आपण आता तरी पाठपुरावा करणार आहात की नाही. तसेच अजून किती दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्यांची आपण वाट पाहणार अाहात? असा सवाल करत त्यांनी सरकारच्या नैतिकतेला आणि सदसदविवेक बुद्धीला अावाहन केले.