मुंबई (प्रतिनिधी) - गेल्या आठ दिवसापासून नगरसेविकांचे निलंबन मागे घेण्यावरून पालिका सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता. या गोंधळावर पूर्ण विराम देण्यासाठी कॉंग्रेसने आज महापौरांच्या वाहनावरील लाल दिवा हटविण्याचा मुद्दा उचलला. महापौरांच्या वर्मावरच कॉंग्रेसने बोट ठेवल्याने महापौरांनी त्वरित निलंबित नगरसेविकांचे निलंबनमागे घेतले. त्यामुळे सकाळपासून सुरू असलेल्या गदारोळावर पडदा पडला.
पालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चेचा सहावा दिवसही गोंधळातच सुरू झाला. सकाळी 11 वाजता सुरू होणारे सभागृह 11.50 सुरू महापौरांनी सुरू केले. सभागृह सुरू होताच कॉंग्रेसचे नगरसेवक प्रविणछेडा यांनी महापौरांच्या वाहनावरील लाल दिवा हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले असताना महापौर वाहनावर नियमबाह्य लाल दिवा वापरत आहेत. यामुळे न्यायालयाचे आणि राज्य सरकारच्या नियमांचे उल्लघंन होत आहे. तरी महापौरांनी वाहनावरील लाल दिवा काढावा, अशी मागणी हरकतीचा मुद्दयाद्वारे केली. तसेच जोपर्यंत लाल दिवा काढला जात नाही तोपर्यंत महापौरांची वाहन रस्त्यावर धावू देणार नसल्याची भूमिका घेतली. यावर महापौर स्नेहल आंबेकर यांनी लाल दिवा हरकतीचा मुद्दा होऊ शकत नसल्याचे सांगताना हरकतीच्या मुद्द्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेवून महापौरांना लाल दिवा दाखवून व शिट्टया वाजून निषेध व्यक्त केला. गोंधळ कायम सुरु राहिल्याने महापौरांनी सभागृहातून बाहेर महापौर दालनात गेल्यामुळे कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनासमोर निर्दशने केली. यावेळी घोषणाबाजी करीत महापौर दालन दणाणून सोडले.
दरम्यान, कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीमध्ये महापौरांचा लाल दिवा काढण्यात येणार असून त्यांना पिवळा दिवा देण्यात येणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. या आश्वासनानंतर महापौरांनी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, भाजपाचे गटनेते मनोज कोटक आणि सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर आंबेकर यांनी पालिका सभागृहात दिलगिरी व्यक्त करताना सहा नगरसेविकांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. दिलगिरी नंतर सभागृहाचे लौकीक कायम राखण्यासाठी महापौरांनी सहा नगरसेविकांचे निलंबन मागे घेतले. यामुळे गेल्या पाच दिवसा पासूनच्या गोंधळावर पडदा जरी पडला असला, महापौरांच्या लाल दिव्यावरील केलेल्या हल्यामुळे महापौरांनी निलंबन मागे घेतल्याची चर्चा पालिकेत सुरू होती
राजदंड पळविला
महापौरांच्या लाल दिवा काढण्यास मनाई केल्यामुळे कॉंग्रेसचे नगरसवेक नौसिर मेहता यांनी राजदंड पळविला. राजदंड पळविल्याने मेहता यांना एक दिवसाकरिता निलंबित केरण्यात आले. शिवसेनेचे राजू पेडणेकर आणि उदय पाठक यांनी मेहता यांच्या हातातून राजदंड हिसकावून आणला.