मुंबई(प्रतिनिधी)- ऑटोरिक्षा- टॅक्सी मालक- चालकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी परिवहन आयुक्तांच्या वांद्रे येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मंगळवार 7 एप्रिल 2015 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरूवात होणार असून यात पूर्व आणि पश्चिम उपनगरातील ऑटोरिक्षा चालक- मालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शंशांक राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबईत अवैध प्रवासी वाहतूकीमुळे ऑटोरिक्षा- टॅक्सी चालक- मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या विरोधात कारवाई करण्यास पोलिस विभाग, वाहतूक विभाग तसेच परिवहन विभागाचे एक विशेष पथक निर्माण करून अवैध वाहतूकीवर कारवाई करावी, अशी मागणी वारंवार करूनही राज्य सरकारच्या संबंधित विभागाने याकडे कानाडोळा केल्याचा आरोप शशांक राव यांनी केला. सरकारने नुतनीकरण न झालेल्या तसेच रद्द ऑटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सायबर संस्थांकडून चूकीची माहीती भरली जात असून चालकांना- मालकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अशा अर्जांचा पूनर्विचार होणे आवश्यक आहे. तसेच 50 टक्के परवान्यांचे वाटप अद्याप झालेले नसून ते विनाविलंब वितरित करण्यात यावेत, अशी मागणी यावेळ राव यांनी केली.