महिला प्रवाशांसाठी रेल्वे पोलिसांची नवी हेल्पलाईन - 9833312222 - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिला प्रवाशांसाठी रेल्वे पोलिसांची नवी हेल्पलाईन - 9833312222

Share This
मुंबई- लोकल ट्रेनमधून प्रवास करणा-या महिला प्रवाशांवर होणारे हल्ले आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने याला आळा घालण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी नवा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या ९८३३३१२२२२ या हेल्पलाईन क्रमांकाकरिता व्हॉट्सअ‍ॅपही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एखादा गुन्हा घडत असताना त्याचा फोटो किंवा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करून लोहमार्ग पोलिसांकडे पाठवून तक्रारही नोंदविता येणार आहे.
सध्या मोबाईलमध्ये बहुतांशपणे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. दिवसातील अधिक वेळा प्रत्येक जण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. त्यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनमध्ये कॉलिंगसोबतच ही व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू केल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.
अनेक वेळा महिलांच्या दिशेने अश्लील हावभाव करणे, अश्लील गाणी बोलणे, चोरटा स्पर्श करणे असे प्रकार सर्रास घडत असतात. मात्र ब-याचदा महिला पोलिसांत तक्रार करण्यास टाळाटाळ करतात. महिला प्रवाशांची ही मानसिकता बदलण्याकरिता रेल्वे पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
लोकलवरील प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफची संख्या अत्यंत कमी असल्याने प्रत्येक वेळी सुरक्षा पुरविणे शक्य होत नाही. लोकलवरील ७५ लाख प्रवाशांच्या संख्येत १० ते १२ लाख महिला दररोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनमुळे संकटसमयी पोलिसांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
महिला सुरक्षेच्या जनजागृतीकरिता लोहमार्ग पोलिसांकडून निर्भया सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकलने प्रवास करताना सतर्क राहा. प्रवासादरम्यान एखाद्या व्यक्तीची संशयास्पद हालचाल असेल, तसेच रेल्वेच्या टपावरून कोणी स्टंटबाजी करीत असेल तर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. एखाद्या घटनेचे फोटो किंवा व्हिडीओ काढून लोहमार्ग पोलिसांकडे महिला प्रवाशांना तक्रार नोंदविता येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages