मुंबई (प्रतिनिधी)- बांद्रा येथील स्काडा केबीनजवळील जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने धारावीमध्ये बुधवार व गुरूवारी पाणी कपात केली जाणार आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जलविभागाने केले आहे.
बांद्रा पूर्व येथील स्काडा केबीनजवळील ३६ इंच व्यासाची स्टब मेन आणि २४ इंच व्यासाच्या नवीन पाली जलवाहिनीला गळती लागली आहे. परिणामी, लाखो लिटर पाणी वाया जात असून ही गळती थांबविण्यासाठी पालिकेने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. बुधवारी सकाळी १० वाजल्यापालून ते गुरुवारी दुपारी १.00 वाजेपर्यंत काम चालणार आहे. यामुळे धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग आणि दिलीप कदम मार्ग या भागात सायंकाळच्या वेळेचा पाणीपुरवठा पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. तर गुरूवारी धारावी प्रेम नगर, नाईक नगर, ६० मार्ग, जस्मीन मील मार्ग, ९० मार्ग, एम.जी.मार्ग, धारावी लूप मार्ग, कुंभारवाडा आदी भागात सकाळच्या वेळेत पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या जलविभागाने सांगितले आहे. तरी नागरिकांना खबरदारी म्हणून पाणी काटकसरीने वापरुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.