मुंबई (प्रतिधिनी) - मुंबईत प्रदर्शित होणाऱ्या गुजराथी चित्रपटांना तसेच गुजराथी नाटकांना करमाफी देण्याच्या प्रस्तावावरून आज पालिकेच्या स्थायी समितीत मनसे विरूध्द भाजपा असा सामना रंगला. गुजराथी नाटक, चित्रपटांना करमाफी देण्यास मनसेचे संदिप देशपांडे यांनी विरोध दर्शविल्यानंतर भाजपा नगरसेवक, शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी देशपांडे यांच्या मुद्द्याला जोरदार विरोध केला. यावेळी गुजराथी नाटक, चित्रपटांना करमाफी देणे कसे संयुक्तिक आहे. याचे काही मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी सपाचे गटनेते यांनी यामध्ये हिंदी भाषेचाही समावेश करावा, अशी उपसूचना मांडली. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी यशोधर फणसे यांनी या उपसूचनेकडे दुर्लक्ष करीत पस्ताव मंजूर केला.
या प्रस्तावावर बोलताना संदीप देशपांडे यांनी गुजराथमध्ये मराठी नाटक, चित्रपटांना सवलत दिली जाते का, असा सवाल करताना मुंबईत का सवलत द्यायचे असा मुद्दा उपस्थित केला. जर गुजराथी नाटकांना सवलत दिल्यास कन्नड, तामिळ या भाषांनाही सवलत दिली जावी, अशी मागणी केली. यावर शेलार यांनी मुळात मराठी- गुजराथी हा वाद योग्य नसल्याचे सांगत. अनेक गुजराथी नाटकांचे मराठीत रुपांतर केले असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे भक्ती बर्वे- इनामदार, शकी इनामदार, मनोज जोशी, सचिन खेडेकर यांच्यासारख्या दिग्गज मराठी कलाकारांनी गुजराथी नाटकामधून काम केले असल्याचे सांगितले. शिवाय मामा वरेरकर या मराठी दिग्दर्शकानेही गुजराथी नाटकांचे दिग्दर्शन केल्याचे सांगितले. त्यामुळे कलेमध्ये राजकारण आणणे चूकीचे असून आपले पक्षप्रमुख राज ठाकरे हे स्वतः उत्कृष्ट कलाकार असून कलेचे रसिक आहेत. जर का त्यांना कळले की तुम्ही कलेत राजकारण करत आहात तर ते तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही यापूर्वी राज ठाकरे यांना विचारणे आवश्यक असल्याचा टोला लगावला.
दरम्यान, या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सदर प्रस्ताव उशीरा का आणला असे सांगत केवळ थिएटरवर कर लावण्यापेक्षा हिंदी सिनेसृष्टीकरूनही वेगळा कर आकारण्यात यावा, असे सांगितले. तर प्रविण छेडा यांनी गुजराथींची लक्ष्मी व मराठ्यांची सरस्वती असे असताना गुजराथींच्या भावना दुखविण्याचे काम संदिप देशपांडे करीत आहेत, हे चूकीचे असल्याचे छेडा म्हणाले.