डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिलला सरकारने केले नाही तर काँग्रेस करेल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिलला सरकारने केले नाही तर काँग्रेस करेल

Share This
मुंबई- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १४ एप्रिल रोजी आहे. त्याच दिवशी इंदू मिलच्या जागेत बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन व्हावे, अशी तमाम जनतेची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दिवशी विदेश दौ-यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांना भूमिपूजनासाठी वेळ नाही. हा डॉ. आंबेडकर यांचा अपमान आहे. १४ एप्रिलला स्मारकाचे उद्घाटन केले नाही, तर नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करील, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला. ते नारायण राणे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. 
डॉ. आंबेडकर यांचा जन्मदिवस आंबेडकरी जनतेसाठी दिवाळीसारखा असतो. याच दिवशी आपल्या महापुरुषाच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन व्हावे अशी भावना तमाम जनतेत आहे. असे असताना भाजपाचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच दिवशी विदेशी दौ-यावर जाणार आहेत. ते भूमिपूजन करणार नाहीत. त्यांना डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यापेक्षा विदेशी दौरा महत्त्वाचा वाटतो. ही अत्यंत खेदाची बाब आहे. ज्या महापुरुषांची नावे घेऊन भाजपा-शिवसेनेचे युती सरकार सत्तेवर आले त्यांच्यासाठी सरकारला वेळ नाही. अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. सरकारला जर भूमिपूजनासाठी वेळ नसेल तर काँग्रेस १४ एप्रिल रोजी नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली इंदू मिलच्या जागेत भूमिपूजन करणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.


अच्छे दिन येतील असे सांगत भाजपा सरकारने मतदारांची फसवणूक केली आहे. मोठय़ा प्रमाणात महागाई वाढवून लोकांना साधी भाजीसुद्धा विकत घेणे अशक्य करून ठेवले आहे. शाळेतल्या मुलांना बसचे तिकीट काढून शाळेत जाणेही अवघड झाले आहे. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मचे तिकीटही या लोकांनी वाढविले आहे. अशा सरकारला कोंडीत पकडा असे आवाहन निरुपम यांनी केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages