राज्यातील रेल्वे सेवेची जबाबदारी राज्यांकडे द्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यातील रेल्वे सेवेची जबाबदारी राज्यांकडे द्या

Share This
मुंबई - 'मुंबईप्रमाणेच राज्यातील रेल्वे सेवेची जबाबदारी संबंधित राज्यांवर सोपवायला हवी. राज्य सरकारला तिथल्या प्रश्नांची चांगली जाण असते. त्यामुळे प्रकल्प प्रलंबित राहणार न राहता ते वेळेत पूर्ण होतील,' असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले. 'ऑर्ब्झव्हर रिसर्च फाऊंडेशन'तर्फे मुंबई उपनगरीय लोकल अपघातासंदर्भात अहवाल प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी, रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष विवेक सहाय, रेल्वे कार्यकर्ते समीर झवेरी आदी उपस्थित होते. 


मुंबईच्या उपनगरीय लोकलच्या समस्या समजून घेण्यास कोणत्याही केंद्र सरकारला वेळ नाही. रेल्वे मार्गाशी संबंधित एखादा पूल बांधायचा असला तरी दोन वर्षे परवानगी मिळत नाही. अशावेळी, राज्यातंर्गत या सेवांची जबाबदारी दिल्यास प्रश्न मार्गी लागतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील उपनगरीय लोकलप्रमाणेच मोनो, मेट्रो ही वाहतूकप्रणाली एकाच यंत्रणेअंतर्गत विकसित करण्याची सूचना 'ऑर्ब्झव्हर रिसर्च फाऊंडेशन' (ओआरएफ)तर्फे मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात मांडण्यात आली आहे.

सुधींद्र कुलकर्णी यांनी मुंबईत दरवर्षी ३,५०० प्रवाशांचा रेल्वे प्रवासात मृत्यू ओढवतो. ही आकडेवारी म्हणजे भोपाळ वायुदुर्घटनेची ही दरवर्षी पुनरावृत्ती असल्याचे म्हणता येईल. मुंबईच्या प्रतिष्ठेला इतक्या प्रमाणात होणाऱ्या अपघाती मृत्यूंची आकडेवारी लाजिरवाणी ठरणारी असल्याचे सांगितले. हा अहवाल तयार करणाऱ्या धवल देसाई यांनी भारतीय रेल्वेने शहराचा अंतर्गत भाग असणाऱ्या उपनगरीय लोकल सेवेचे व्यवस्थापन करू नये, अशी सूचना केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages