मुंबई: ३० मार्च - तानसा धरणातून मंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पाईपलाईन ठाण्याच्या किसननगर भागात फुटल्यामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे त्या भागातील सुमारे दहा हजार नागरिक बाधित झाले आहेत. या घटनेत बाधित झालेला वर्ग हा प्रामुख्याने कष्टकरी असून झालेल्या नुकसानीमुळे ही कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. एकूण या घटनेमुळे एक प्रश्नचिन्ह त्यांच्या भवितव्यावर उभे राहिले असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने त्वरीत निवेदन करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभेत केली.
तसेच या घटनेला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेत्यांनी महापालिकेच्या संबंधित पाईपलाईन दुरूस्ती यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेला हा स्थगन प्रस्ताव निकषात बसत नसल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळला मात्र विषयाचे गांभीर्य लक्षात घेता. शासनाने याप्रकरणी निवेदन करावे, असे निर्देश राज्य सरकारला दिले.
