मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या कुलाबा विभागात झोपडीधारकांची पाण्यासाठी पिळवणूक सुरु असून आर्थिक लुट होत आहे. झोपडी धारकांची होणारी लुट आणि पिळवणूक त्वरित थांबवावी अशी मागणी दलित प्यान्थर संघटनेचे मुंबई अध्यक्ष प्रताप रावत यांनी पालिका आयुक्त याना पत्र देवून केली आहे. परंतू हि पिळवणूक आणि आर्थिक लुट थांबवण्यात आयुक्त आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करत नसल्याचा आरोप रावत यांनी केला आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या कुलाबा येथील ए वार्ड मधील प्रभाग क्रमांक २२५ व २२६ च्या हद्दीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मूर्ती नगर इत्यादी सरकारी जमिनीवरील ८ ते ९ हजार झोपडीधारकांना पाण्यासारख्या मुलभूत गरजेपासून पालिका वंचित ठेवत आहे. पाणी माफिया आणि ए वार्ड मधील अधिकारी संगनमत करून दरमहिन्याला एका झोपडी धारकाला ४०० ते ५०० रुपये देवून पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे जे उत्पन्न पालिकेला मिळायला हवे ते उत्पन्न पाणी माफिया आणि पालिकेचे अधिकारी वाटून घेत आहेत. उच्च न्यायालयानेही २००० नंतरच्या झोपडी धारकांना पाणी द्यावे असे आदेश दिले आहेत. हे आदेश असले तरी पालिकेने तसे धोरण मंजूर केले नसल्याने पाणी माफियांची घरे भरण्यास पालिका मदत करत आहे. सामान्य झोपडीधारकांची मात्र पाण्यासाठी आर्थिक लुट आणि पिळवणूक होत आहे असे रावत यांनी म्हटले आहे. पाणी चोरी करून जास्त किमती मध्ये पाणी विकणाऱ्यांवर कारवाई करावी व पी फॉर्म पद्धत बंद करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री, राज्यपाल व पोलिस आयुक्त यांना दिले आहे. पालिका आयुक्त या आर्थिक पिळवनुकीकडे दुर्लक्ष करत असल्याने राज्य सरकारने कुलाब्यातील झोपडीधारकांना न्याय द्यावा अशी मागणी रावत यांनी केली आहे.