महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी परिवहनमंत्र्यांशी चित्रा वाघ यांची भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी परिवहनमंत्र्यांशी चित्रा वाघ यांची भेट

Share This
मुंबई : महिलांचा रिक्षाप्रवास सुरक्षित होण्याबाबत राज्य महिला आयोगाच्या सदस्य चित्रा वाघ यांनी आज राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. यासंदर्भात राज्य सरकारच्या पातळीवर आवश्यक ती पावले तातडीने उचलू आणि गरज आहे तेथे केंद्र सरकारची मदत मिळवण्यात येईल आणि त्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन या भेटीदरम्यान परिवहनमंत्री रावते यांनी दिल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.


ठाण्यात दोन तरुणींनी चालत्या रिक्षातून उडी मारण्याची घटना घडली होती. गेल्या ऑगस्टमध्ये स्वप्नाली लाड या मुलीनेही रिक्षाचालकाच्या भीतीने चालत्या रिक्षातूनच उडी मारली होती. त्या धक्क्यातून स्वप्नाली अजून सावरलेली नाही. तसेच तो रिक्षाचालक अजूनही मोकाट असतानाच ठाण्यात पुन्हा तसाच प्रकार घडल्यामुळे महिलांमध्ये सुरक्षेच्या विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या सदस्य या नात्याने चित्रा वाघ यांनी सोमवारीच ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मंगळवारी त्यांनी परिवहनमंत्री रावते यांना भेटून काही मागण्यांचे पत्रकही त्यांना दिले. 

परिवहनमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रातील ठळक मुद्दे - 
१ ठाण्यात घडलेल्या प्रकारामुळे मुजोर रिक्षाचालकांना पोलिस, यंत्रणा यांची भीती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरटीओ विभागाकडे वाहने जप्त करण्याचेही अधिकार असतात. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी या विभागाची मदत घ्यावी.
२ ठाण्यातील सुमारे २२ हजार रिक्षांवर ट्रॅफिक स्मार्ट आयडी ही संकल्पना तेथील डीसीपी रश्मी करंदीकर यांच्या कल्पनेतून अंमलात आली आहे. रिक्षाचालकाच्या पाठीच सीटवर एक आयडी कार्ड लावण्यात येते. त्यावर रिक्षाचालकाचे नाव, परमीट नंबर, गाडी नंबर अशी माहिती नमूद असते. तसेच तेथे एक हेल्पलाइन क्रमांकही दिलेला असून या २४ तास हेल्पलाइनवर प्रवाशांना आणिबाणीच्या प्रसंगी मदत मागता येते. ही पद्धत अतिशय उपयुक्त असून राज्याच्या सर्वच महानगरांमध्ये प्रत्येक रिक्षासाठी ती बंधनकारक करावी.
३ आरटीओमध्ये २००५नंतरच्या नोंद वाहनांचा डेटा संगणकीकृत आहे. पण त्यापूर्वीच्या गाड्यांची माहिती संगणकीकृत नाही. ती तातडीने अपडेट करण्यात यावी.
४ रिक्षा निकालात काढण्याचा (स्क्रॅप) कालावधी निश्चित करावा.
५ दंडवसुलीतून जमा होणाऱ्या रकमेचा अर्धा हिस्सा संबंधित विभागाला द्यावा. त्यातून विकास वा अन्य उपक्रम घेणे शक्य होईल.
६ शहरांतील सर्वच मुख्य सिग्नलवर नंबर प्लेटची नोंद घेणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. यमुना एक्स्प्रेसवेवर आहेत, तसे वायरलेस कॅमेरे बसवण्याचाच प्रयत्न व्हावा.
''परिवहनमंत्री रावते यांच्यासोबत झालेली ही भेट महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त होती. त्यांच्याशी झालेली चर्चा समाधानकारक होती. मात्र, या प्रश्नाची तड लागेपर्यंत आम्ही महिला आयोगातर्फे पाठपुरावा करतच राहणार आहोत,'' असे या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages