स्वाईन फ्लूने होणाऱ्या मृत्यूची खोटी आकडेवारी सादर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वाईन फ्लूने होणाऱ्या मृत्यूची खोटी आकडेवारी सादर

Share This
पालिकेतील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करू - महापौर
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई मध्ये स्वाईन फ्लू आजाराने हाहाकार माजवला असताना मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या आकडेवारीमध्ये तफावत आढळत आहे. पालिका सादर करत असलेल्या आकडेवारी वरून स्वाईन फ्लूमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी लपवली जात असल्याचे उघड झाले आहे. पालिकेकडून मृतांची खोटी आकडेवारी सादर करण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच अनेक नगरसेवकांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. 

महानगर पालिकेतील आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार १९ जानेवारी २०१५ पासून २२ फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्वाईन फ्लूचे मुंबई मधील २४० रुग्ण आढळले होते त्यावेळी मुंबई मधील १ रुग्ण मृत झाला होता. याच दिवशी मुंबई बाहेरील १ रुग्ण आढळल्याने मुंबई बाहेरील ७२ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई बाहेरील २४ फेब्रुवारीला १, २५ फेब्रुवारीला १, २६ फेब्रुवारीला २, २७ फेब्रुवारीला १ अश्या ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १७ झाली होती. मुंबई बाहेरील १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे २७ फेब्रुवारी पासून २ मार्च पर्यंत आकडेवारी सादर करण्यात येत होती. परंतु ३ मार्च पासून ८ मार्च पर्यंत हि आकडेवारी बदलून १७ मृत्यूंच्या ऐवजी १३ रुग्ण मृत्यू पावल्याची आकडेवारी सादर करण्यातयेत आहे. ९ मार्च आणि १० मार्चला मुंबई बाहेरील पुन्हा दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने अद्याप १५ मृत्यू दाखवण्यात येत आहेत. वास्तविक पाहता मुंबई बाहेरील अद्याप १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई मधील ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिका ३ मार्च पासून सादर करत असलेल्या चुकीच्या आकडेवारीवरून मुंबई मधील ७ आणि मुंबई बाहेरील १५ अश्या एकूण २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगत असली तरी मुंबई मधील ७ आणि मुंबई बाहेरील १९ अश्या एकूण २६ रुग्णांचा स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान हा प्रकार विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांच्या निदर्शनास आणल्यावर आंबेरकर यांनी खोट्या आकडेवारीबाबत संताप व्यक्त करत पालिका प्रशासन आणि शिवसेना भाजपा हे सत्ताधारी स्वाईन फ्लूबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे. मुंबईकर नागरिक स्वाईन फ्लूमुळे त्रस्त झाले आहेत, रुग्णांचा मोठ्या संखेने मृत्यू होत आहे अशी परिस्थिती असताना पालिका प्रशासन मात्र खोटी आकडेवारी सादर करण्यात गुंग आहे. खोटी आकडेवारी सादर करणाऱ्या प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक राहिलेला नाही अशी टिका आंबेरकर यांनी केली आहे. तसेच मृतांची खोटी आकडेवारी सादर करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंबेरकर यांनी केली आहे. तर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून अशी खोटी आकडेवारी सादर करण्यात आल्याचा प्रकार महापौर स्नेहल आंबेकर यांच्या निदर्शनास आणल्यावर खोटी आकडेवारी सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल असे महापौरांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages