मुंबई दि. 12 (प्रतिनिधी) -
मुंबईतील पदपथ व रस्त्याच्या कडेला असलेली विविध धर्मांची व पंथांची मंदिरे तसेच प्रार्थना स्थळे हटवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे. याबाबत काही धार्मिक स्थळांना आपले म्हणणे मांडायचे आहे त्यासाठी महापालिकेने आपल्या पातळीवर सुनावणी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिले. मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले असल्याने धार्मिक स्थळांना आपले म्हणणे मांडण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.
मुंबईतील पदपथावर असणाऱ्या धार्मिक स्थळे तोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत या धार्मिक स्थळांचे म्हणणे आमदार आशिष शेलार यांनी सरकारकडे मांडले. यापूर्वी सर्व धार्मिक स्थळांची अ व ब अशी वर्गवारी करून त्यांना १९९५ पूर्वीची कागदपत्रे सादर करण्यास सांगून त्यांची सुनावणी घेण्यात आली होती. यातून काही धार्मिक स्थळे नियमित करण्यात आली व काहीचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित धार्मिक स्थळांवर हटवण्याची कारवाई करण्यात येणार आहे. मात्र त्यांनाही आपली बाजू मांडायची होती याबाबत आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करून यासर्वांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे मांडले त्यावर निर्णय देताना मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकरची सुनावणी महापालिका पातळीवर घेण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले.
धार्मिक स्थळे ही जनतेच्या भावनांशी जोडलेली असल्यामुळे या धार्मिक स्थळांवर कारवाई करताना मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यासर्वाचा विचार करून सरकारने ही सुनावणी घ्यावी अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी सरकारला केली.
