एमएमआरडीएचा ३८३२ कोटींचा अर्थसंकल्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 March 2015

एमएमआरडीएचा ३८३२ कोटींचा अर्थसंकल्प

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १३७ व्या बैठकीमध्ये २0१५-१६ साठी ३८३२.३0 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात मुंबई नागरी परिवहन प्रकल्प, कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्ग, मोनो रेल प्रकल्पाचा दुसरा टप्पा, उड्डाणपूल, रस्त्यांचा विकास याबरोबरच पायाभूत सुविधांसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. 
एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पीय बैठकीत छेडा नगर येथे होणार्‍या वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून दोन उड्डाणपूल आणि एक उन्नत मार्ग बांधण्यासही परवानगी दिली. पूर्वमुक्त मार्ग आणि सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यावरून येणारी वाहने छेडा नगर येथे वाहतूक कोंडी निर्माण करतात.सायन येथे ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या तीन मार्गिकांच्या उड्डाणपुलास समांतर असा तीन मार्गिकांचा ६८0 मीटर लांबीचा एक उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. नवी मुंबईकडून येणारी वाहने ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी दोन मार्गिकांचा व १२४0 मीटर लांबीचा उड्डाणपूल सध्याच्या छेडा नगर उड्डाणपुलावरून पूर्व द्रुतगती मार्गास जाऊन मिळणार आहे. छेडा नगर उड्डाणपूल आणि अमर महाल जंक्शन उड्डाणपूल यांना जोडणार्‍या ६५0 मीटर लांबीचा व दोन मार्गिकांचा उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून याची अंदाजीत किंमत २४९.२९ कोटी इतकी आहे.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प १ आणि २ साठी अर्थसंकल्पामध्ये १00५ कोटी इतकी तरतूद करण्यात आली असून त्यानुसार छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि कुर्लादरम्यानचा ५ वा ६ वा रेल्वे मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यानचा ६ वा रेल्वे मार्ग, हार्बर मार्गाचा अंधेरीपासून गोरेगावपर्यंतचे विस्तारीकरण, डीसीचे एसीमध्ये रूपांतर, आधुनिक पद्धतीच्या ईएमयूचे उत्पादन, त्यांची देखभाल आणि स्टेबलिंग, तांत्रिक सहाय्य व संस्थात्मक बळकटी, स्थानक सुधारणा यांचा समावेश आहे. 

शहर आणि महानगर प्रदेशात सहज, सुलभ आणि गर्दीरहित प्रवासाची सोय उपलब्ध करणे हाच उद्देश असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ मार्गासाठी १८0 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे स्पष्ट केले. ७५८.५0 कोटींच्या तरतुदीमुळे अर्नाळा-विरार-शिरसाड, अंबाडी, वाशिंद, कल्याण, बदलापूर, कर्जत हलफाटा, कर्जत ते हाळफाटा, कटाई नाका बदलापूर यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करणे याच प्रकल्पाचा एक भाग आहे. त्याचप्रमाणे वंजारपट्टी, राजनोली, मानकोली या उड्डाणपुलाचे बांधकाम, रेवस आणि कारंजादरम्यान खाडी पूल, माणकोली मोटेगाव मार्ग आणि उल्हास खाडीनजीक कल्याण-भिवंडी या उड्डाणपुलांचा यात समावेश आहे. 

मोनो रेलच्या दुसर्‍या टप्प्यासाठी ४0२.६0 कोटी, कुलाबा-वांद्रे-सिप्झ या तिसर्‍या मेट्रो मार्गासाठी १८0 कोटी रुपये, दहिसर, चारकोप, वांद्रे, मानखुर्द आणि वडाळा, घाटकोपर, ठाणे कासारवडवली मेट्रो मार्गाच्या अभ्यासासाठी २७.५0 कोटींची तरतूद केली आहे. तर नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी प्राधिकरणातर्फे १६१.४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यात खेरवाडी उड्डाणपुलाची उत्तरेकडील बाजू, वांद्रे-कुर्ला संकुलातील जी ब्लॉकपासून चुनाभट्टीपर्यंतचा उन्नत मार्ग आणि अंधेरी-घाटकोपर जोडरस्ता अशी कामे मार्गी लावण्यात येणार आहेत, तर बीकेसीसाठी ६५.४५ कोटी, वडाळा ट्रक टर्मिनलसाठी ६५.४५ कोटी, वडाळा ट्रक टर्मिनलसाठी ६५.५१ कोटी रुपये, मिठी विकास प्रकल्पासाठी ३२ कोटी आणि प्रादेशिक जलस्रोत विकासासाठी ८७.९0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Post Bottom Ad