बेस्टने नोटीस पाठविली
सहाय्यक आयुक्तांना नाही मिळाली
मुंबई, मंगळवार (प्रतिनिधी) - परळ येथील प्रिं. वामनराव महाडीक संकल्पना उद्यानाचे वीज बील थकीत असल्याने बस्टने प्रशासनाने वीज पूरवठा खंडीत केला. याबाबत आपल्याला माहितीच नसल्याचे पालिका एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले. तर तीन वेळा बील भरण्याच्या नोटीस पाठवूनही कुऱ्हाडे यांनी कानाडोळा केल्याचा आरोप बेस्ट प्रशासनाने केला आहे. त्यामुळे दोघांच्या वादात जाणूनबूजून मुलांसह नागरिकांना अधांरात ठेवणाऱ्या सहाय्यक आयुक्तांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे.
परळ येथील बच्चेकंपनीसह स्थानिक नागरिकांकरीता कै. प्रिं. वामनराव महाडीक उद्यान बांधण्यात आले. महापौर श्रध्दा जाधव यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करून उद्धाटन केले. सकाळी आणि सांयकाळच्या वेळेस येथे काळाचौकी, परळ, शिवडीसह अन्य विभागातील नागरिक याठिकाणी येत होते. मात्र, डिसेंबर महिन्याचे 6 लाख 22 हजार 6 रुपये बील थकीत असल्याने बेस्टने 26 फेब्रुवारी रोजी उद्यानाचे वीज कापले. त्यास्वरूपाचे माहीती पालिका सहाय्यक आयुक्तांना दिली. उद्यान विभागाने याची दखल घेत उद्यानाच्या वेळेत बदल करण्यात आल्याचे फलक उद्यान परिसरात लावले. परिणामी, नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे स्थानिकांनी कुऱ्हाडे यांच्याकडे विचारणा केली असता, आपल्याकडे याबाबत माहीती नाही. माहिती घेऊन कळवितो, असे सांगण्यात आले. मात्र, तीन दिवस होऊन गेले तरी आयुक्तांनी माहिती न दिल्याने स्थानिकांनी मनसेकडे धाव घेतली. मनसेचे विभाग अध्यक्ष सचिन देसाई आणि शिवडी विधानसभा उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन उद्यानाचे थकित बील भरुन नागरिकांची गैरसोय टाळण्याची मागणी केली. तसेच उद्यानात वीज कार्यन्वित न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. याची दखल घेत उद्यानात वीज कार्यान्वित करण्यात आली.
दरम्यान, याबाबत पालिका सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला थकित बीलाची कोणतीही नोटीस मिळालेली नाही किंवा तोंडीही सांगण्यात आलेले नाही. बेस्ट प्रशासन खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र सध्या वीज पुन्हा सुरु करण्यात आल्याचे सांगितले.
बेस्टने पालिका सहाय्यक आयुक्त कुऱ्हाडे यांच्या नावाने 31 जानेवारी 2015, 7 फेब्रुवारी 2015 आणि 26 फेब्रुवारी 2015 रोजी थकित बीलासंबंधित नोटीस पाठविली होती. पंरतु, पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे 27 फेब्रुवारी रोजी वीज पुरवठा खंडीत करावा लागल्याचे बेस्ट विद्यूत पुरवठा विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
