मुंबई / प्रतिनिधी - बीपीटीच्या जागेवर शिवडी पूर्व रामगढ येथील ७० ते ८० वर्षे राहणाऱ्या रहिवाश्यांच्या झोपड्या बीपीटी प्रशासनाने पोलिसांचा वापर करत कोणत्याही पुराव्याची शहानिशा न करता तोडल्या आहेत. पुरावे न पाहता झोपड्या तोडणाऱ्या बीपीटीच्या अधिकाऱ्यांवर तसेच लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचा इशारा रामगढ रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष युसुफ इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे रिपब्लिकन पक्षाचे दिलीप गायकवाड व दलित प्यान्थरचे प्रताप रावत यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत युसुफ इनामदार बोलत होते. ३ मार्च २०१५ रोजी रामगढ येथील झोपड्या तोडण्याची कारवाई बीपीटी प्रशासनाने केली. या वेळी १२ तासात घरे खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. येथील झोपड्यांवर कारवाई करताना रहिवासी आपले पुरावे दाखवण्यास गेले असता पोलिसांनी त्यांचे पुरावे फेकून देत अमानुष पणे लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये काही रहिवाशी आणि १२ वर्षीय फातिमा शेख नावाची लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. फातिमा शाळेतील कपड्यांवर असतानाही तीला पोलिसांनी मारहाण केली आहे. यात फातीमाचे नाकाचे हाड तुटले असल्याने तिला केईएम रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे इनामदार यांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर व १९९५ पूर्वीच्या झोपड्या पुनर्वसन न करता तोडणाऱ्या बिपीटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच रामगढ येथील रहिवाश्यांकडे पुरावे असल्याने त्यांची पर्यायी जागा देवून पुनर्वसन करावे अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. रहिवाश्यांच्या मागण्यांकडे बीपीटी प्रशासन, पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यास रिपब्लिकन पक्ष व दलित प्यान्थरच्या सहकार्याने आठवडा भरात मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक रहिवाश्यांनी दिला आहे.


