रेल्वे स्थानकांवरील एटीव्हीएम मशिन धूळखात पडल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे स्थानकांवरील एटीव्हीएम मशिन धूळखात पडल्या

Share This
मुंबई- रेल्वे स्थानकांतील तिकिटांच्या रांगा कमी करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासनाकडून ६ कोटी ५१ लाख रुपये खर्च करून मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांत एटीव्हीएम मशीन लावण्यात आल्या. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे अनेक स्थानकांमधील या मशीन धूळखात पडल्याचे पाहायला मिळत आहे. 

तर काही स्थानकांत केवळ फॅसिलेटर (मार्गदर्शक) असल्यासच प्रवासी मशीनसमोर रांगा लावत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कोटयवधी रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या या मशीनकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.
मध्य रेल्वेवरील स्थानकांवर सध्या जवळपास ४३४ मशीन कार्यरत आहेत. एक एटीव्हीएम मशीन खरेदी करण्याकरिता सुमारे दीड लाख रुपये रेल्वेला खर्च येतो. सीएसटी, दादर, घाटकोपर, कुर्ला, ठाणे, कल्याण आणि अन्य महत्त्वाच्या स्थानकांवर प्रत्येकी १० ते १५ एटीव्हीएम मशीन कार्यरत आहेत.
मात्र त्या तुलनेत या मशीनचा उपयोग होत नसल्याचे रेल्वेचे अधिकारीही सांगत आहेत. प्रवाशांच्या सोयीकरिता मोबाईल तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली होती. तांत्रिक बाबी हाताळण्यात रस नसल्याने प्रवासी या मशीनकडे पाठ फिरवत असल्याचे समोर येत आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून काही स्थानकांत फॅसिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र त्यांना उत्पन्नातील पाच टक्के हिस्सा द्यावा लागत असल्याने मध्य रेल्वेचे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकिटांकरिता स्मार्ट कार्डचा वापर करून तिकीट काढल्यास वेळही वाचेल, शिवाय रेल्वेचे नुकसान होणार नाही. शिवाय अनेक वेळा या मशीन प्रवाशांच्या रागाला बळी ठरतात, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
संग्रहित छायाचित्र

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages