मी आणि कॉ. गोविंद पानसरे दोघेही कोल्हापूरचे; पण आमची तशी खास मैत्री नव्हती. आमच्या दोघांचे एक कॉमन मित्र होते. ते म्हणजे, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील. कॉ. पानसरे यांनी कोळसे-पाटील यांच्याकडे एकदा निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. धनराज वंजारी यांच्या पुस्तकाचा विषय काढला. त्यावर कोळसे-पाटील यांनी त्यांना ‘हू किल्ड करकरे?’ हे माझे पुस्तकही अवश्य वाचा, असे सांगितले.
"हू किल्ड करकरे?' वाचून कॉ. पानसरे यांनी मला फोन केला. २६/११ हल्ल्याची अंधारी बाजू उजेडात आणल्याबद्दल धन्यवादही दिले. पुढे आमचा परिचय वाढत गेला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा फोन आला. म्हणाले, ‘हू किल्ड करकरे? या तुमच्या पुस्तकावर आपल्याला एक कार्यक्रम ठेवायचा आहे.’ ३० डिसेंबर तारीख मुक्रर झाली. कार्यक्रमाचे ठिकाण ठरले, दसरा चौकातले शाहू स्मारक.
कॉ. पानसरे यांच्या कामाची पद्धत नियोजनबद्ध होती. आमच्या परिसंवादाची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. वर्तमानपत्रांत तशा बातम्या आल्या. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत, शिवसेनेचे राजेश क्षीरसागर. त्यांनी या कार्यक्रमाविरुद्ध दंड थोपटले. परिसंवाद उधळवून लावण्याचा इशारा दिला. पण, कॉ. पानसरे काही बधले नाहीत.
कार्यक्रमाला दोन दिवस शिल्लक होते. परत हिंदुत्ववादी संघटनांनी उचल खाल्ली. या परिसंवादाला परवानगी देऊ नका, अशी या संघटनांनी मागणी केली. पोलिस म्हणाले, परवानगी आम्ही नाकारू शकत नाही. कारण ‘हू किल्ड करकरे?’ पुस्तकावर बंदी नाही. शेवटी, संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची अट घालण्यात आली.
शाहू स्मारकात कार्यक्रमादिवशी तोबा गर्दी उसळली. बाहेर दोनशे खुर्च्या आणि दोन स्क्रीन लावावे लागले. २६/११च्या मुंबई हल्ल्याची मी माझी थेअरी सांगितली. न्यूज चॅनेलचे फुटेजही स्क्रीनवर दाखवण्यात आले. लोकांचा प्रतिसाद उत्तम होता. कॉ. पानसरे यांचे व्याख्यान खणखणीत झाले. २००८मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात अभिनव भारत संघटना कशी गुंतली होती, त्याचा मी सविस्तर खुलासा केला. त्या दिवशी ‘हू किल्ड करकरे?’ आणि ‘२६/११ प्रोब, व्हाय ज्युडिशियरी अल्सो फेल्ड?’ या माझ्या दोन्ही पुस्तकांची धडाक्यात विक्री झाली. त्या दिवशी काही गोपनीय दस्तऐवजांच्या झेरॉक्स आम्ही विक्रीस ठेवल्या होत्या. काय होत्या त्या?
एक म्हणजे, मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी अभिनव भारत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आठ कार्यकर्त्यांवर दाखल केलेले चार्जशीट. दुसरे म्हणजे, फरिदाबाद येथे झालेल्या अभिनव भारत संघटनेच्या बैठकीचा वृत्तांत ज्यामध्ये बॉम्बस्फोट कटाची माहिती होती. तिसरे म्हणजे, मुंबईवरील २६/११ हल्ल्याची ‘आयबी’(गुप्तचर विभाग)ला कशी माहिती होती, त्याबाबत केंद्राने नेमलेल्या समितीच्या रिपोर्टबाबतच्या बातम्यांची कात्रणे होती. ही सारी कात्रणं जमलेल्या श्रोत्यांनी विकत घेतली.
कॉ. पानसरे यांना कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल हायसे वाटले. त्यानंतर असाच कार्यक्रम पुण्यात राष्ट्र सेवादलाच्या मंडळींनी ठेवला होता. १२ जानेवारी रोजी तो होणार होता. कार्यक्रम पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. चार दिवसांवर कार्यक्रम असताना अचानक निरोप आला, महत्त्वाच्या बैठकीमुळे १२ जानेवारीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नंतरची तारीख तुम्हाला कळवण्यात येईल. १४ जानेवारीला मला कॉ. पानसरे यांचा फोन आला, पुण्याचा कार्यक्रम कसा झाला म्हणून. मी म्हणालो, कार्यक्रम ऐन वेळी रद्द केला. त्यांनी ओळखले. ते म्हणाले, समाजवाद्यांनी ऐन वेळी कच खाल्ली म्हणायची. पुण्याचा कार्यक्रम रद्द झाल्याचे कॉ. पानसरे यांच्या मनास फार लागले. नंतर त्यांनी मला फोन केला. म्हणाले, ‘मुश्रीफ, काळजी करू नका. मी एक कार्यक्रमच आखलाय. भगव्या दहशतवादावर आता राज्यभर मी दीडशे व्याख्याने देण्याचे ठरवले आहे. भाकप या आमच्या पार्टीलाही तसे सांगितले आहेच, पण पार्टी बैठकीत तसा ठरावसुद्धा मंजूर करून घेतला आहे.’
त्यांच्या दीडशे व्याखानांपैकी अद्याप एकही झालेले नव्हते, तोवरच त्यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी ऐकावी लागली. ‘हू किल्ड करकरे?’वरील परिसंवादामुळे पूर्ण डिसेंबर महिना कोल्हापुरात धुसफूस होती. वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने छापले जात होते. हे सारे ‘आयबी’च्या नजरेतून कसे काय सुटले? हा पोलिस अधिकारी म्हणून मला पडलेला प्रश्न आहे.
पोलिस खात्यातील प्रदीर्घ अनुभवामुळे माझा असा ठाम दावा आहे की, ‘आयबी’ला कॉ. पानसरे यांच्या जिवाला धोका असल्याची चांगलीच कल्पना असावी. त्यांनी तसे राज्याच्या गृह विभागाला नक्कीच कळवलेसुद्धा असणार. जर कळवले नसेल, तर का कळवले नाही, हे जनतेला कळायला हवे. कळवले असेल, तर त्यावर काहीच उपाययोजना का झाली नाही,
मुंबईवरील २६/११ हल्ल्याची ‘आयबी’ला कल्पना होती. नुसती कल्पना नव्हती, तर अतिरेक्यांच्या प्रत्येक टप्प्याची माहिती होती.
मुंबईवरील २६/११ हल्ल्याची ‘आयबी’ला कल्पना होती. नुसती कल्पना नव्हती, तर अतिरेक्यांच्या प्रत्येक टप्प्याची माहिती होती.
एवढा पॉवरफुल गुप्तचर विभाग
डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरेप्रकरणी इतका हतबल का झाला? आयबी आणि हिंदुत्ववादी संघटना यांची कशी मिलीभगत आहे, याविषयी मी अनेकदा बोललो आहे. तोच धागा मला कॉ. पानसरेप्रकरणी दिसतो आहे.
डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरेप्रकरणी इतका हतबल का झाला? आयबी आणि हिंदुत्ववादी संघटना यांची कशी मिलीभगत आहे, याविषयी मी अनेकदा बोललो आहे. तोच धागा मला कॉ. पानसरेप्रकरणी दिसतो आहे.
कॉ. पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारीला हल्ला झाला. त्याच दिवशी भाकपच्या दिल्ली कार्यालयाने प्रेसनोट काढली आहे. त्यातही हिंदुत्ववादी शक्तींवरच संशय व्यक्त झालेला दिसतो. कॉ. पानसरे वाचले असते, तर मारेकरी कळले असते. खरं तर कॉ. पानसरे यांची हत्या हा एका व्यापक राजकीय कटाचा भाग आहे. त्यांच्या हत्येचा संबंध कोल्हापूरच्या टोल आंदोलनाशी जोडणे हा मला बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न वाटतो. त्यापेक्षा ‘शिवाजी कोण होता?’ या विषयावरची त्यांची व्याख्याने आणि ‘अभिनव भारत’ या संघटनांचे कारनामे उघड करण्यासंदर्भात त्यांनी केलेला दीडशे व्याख्यानांचा ‘संकल्प’ या मुद्द्यांभोवती तपास का केंद्रित केला जात नाही? हा या क्षणी मला पडलेला प्रश्न आहे.
एस. एम. मुश्रीफ
शब्दांकन - अशोक अडसूळ
एस. एम. मुश्रीफ पोलिस महानिरीक्षक (निवृत्त) आहेत. त्यांची ‘हू किल्ड करकरे ?’ आणि ‘२६/११ प्रोब व्हाय ज्युडिशियरी अल्सो फेल्ड’ ही पुस्तके प्रकाशित आहेत.

No comments:
Post a Comment