मुंबई (अजेयकुमार जाधव) : सभागृहाचे सदस्य नसल्याचे कारण सांगत कॉ. गोविंद पानसरे यांचा शोकप्रस्ताव फेटाळणाऱ्या भाजप-सेना सरकारला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान सभा अध्यक्षांकडे खेचले आहे.
१९४८ पासून डिसेंबर २०१४ पर्यंत कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या तब्बल ६० लोकांचे शोकप्रस्ताव सभगृहात मांडल़्याची व श्रध्दांजली वाहिल्याची यादीच विखेपाटील यांनी अध्यक्षांकडे आज दिली. आजवर धिरूभाई अंबानी, तर्कतिर्थ लक्षणशास्त्री जोशी, बाळासाहेब देवरस, मदर तेरेसा, कवी कुसुमाग्रज सुधीर फडके, गोविंदभाई श्राफ, बाळासाहेब ठाकरे नेल्सन मंडेला, पंडित भिमसेन जोशी, पत्रकार बाळ देशपांडे अशा तब्बल साठ मातब्बरांचा शोकप्रस्ताव मांडल्याचा इतिहास असताना कॉ. पानसरे केवळ साम्यवादी विचाराचे आहेत म्हणून सरकार टाळाटाळ करते की काय अशी शंका विखेपाटील यांनी व्यक्त केली.
विखेपाटील यांनी साठ लोकांची यादी तारखांसह सादर केल्यामुळे भाजपच्या नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे.एरवी आम्ही सत्याच्या बाजूचे सत्तेत असलो तरी सरकारच्या चूकीच्या गोष्टीचा विरोध करू असे म्हणाऱ्या सेनेचीही पंचाईत झाली आहे. सेनेच्या धुरिणांनाही बिगर सदस्यांचे शोकप्रस्ताव सभागृहात मांडल्याचे माहित असूनही त़्यांनी आग्रह धरण्याऐवजी मौन पाळणे पसंत केले. त्यामुळे सरकारला ९ मार्च पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
