लाच मागणाऱ्यांची माहिती फेसबुकवर झळकणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लाच मागणाऱ्यांची माहिती फेसबुकवर झळकणार

Share This
मुंबई : शासकीय कामासाठी लाच घेताना जर तुम्ही पकडला गेलात तर तुमचे फोटो तसेच तुमच्या विरोधात लाचलुचपत खात्याकडून (अँण्टीकरप्शन ब्युरोकडून) करण्यात आलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती आता थेट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुकवर झळकणार आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने हे अधिकृत फेसबुक पेज सुरू करून या माध्यमातून शासकीय विभागात भ्रष्ट काम करणार्‍यांना जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


या फेसबुक पेजचे सर्वच थरातून स्वागत करण्यात येत असून या फेसबुकला संपूर्ण जगभरातून २२१२२ लाइक्स मिळाले आहेत.राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंध खात्याने लाच घेणार्‍या शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. मागील वर्षभरात एसीबीच्या जाळ्यात अनेक शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी अडकले आहेत. मात्र त्यानंतरही विविध शासकीय विभागातील लाचखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या लाचखोरांवर एसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईची सविस्तर माहिती व त्यांचे फोटो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यास बदनामीच्या भीतीने लाचखोरी कमी होईल, या हेतूने एसीबीने सोशल मीडियाच्या म्हणजेच फेसबुकच्या माध्यमातून लाचखोरांना जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी राज्याच्या एसीबीने फेसबुकचे अधिकृत पेज सुरू केले आहे.

या फेसबुकच्या माध्यमातून लाच घेताना तसेच अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराबाबत एसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती, शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांना लाच घेण्याकरिता मदत करणारे खाजगी इसम व न्यायालयात दोषी ठरलेल्या आरोपींची छायाचित्रे व प्रेसनोट अद्ययावत ठेवण्यात येत आहे. एसीबीच्या जिल्हास्तरावरील युनिट कार्यालयांनी राबवलेल्या भ्रष्टाचाराविरोधी जनजागृती मोहिमेबाबतची (ऑडिओ/व्हिडिओ/फोटो) माहिती तसेच जिल्हास्तरावरील वृत्तपत्रांमध्ये एसीबीच्या कारवाईची प्रसिद्ध झालेली कात्रणे आदी फेसबुक पेजवर ठेवण्यात येत असल्याची माहिती एसीबीच्या अधिकार्‍यांनी दिली. एसीबीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी विविध ठिकाणी दिलेल्या व्याखानाबाबतची माहितीदेखील लोकांच्या मार्गदर्शनाकरिता फेसबुक पेजवर ठेवण्यात येत आहे. या माहितीबरोबरच जनतेला फेसबुक पेजवरून लोकसेवकाविरुद्ध लाचेची, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराबाबत तक्रार नोंदवण्याची सुविधादेखील एसीबीकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages