पात्र विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा २५ हजार विद्यावेतन
२७ एप्रिल अंतिम मुदत
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत नियमित व पूर्णवेळ पीएच.डी सुरु करण्यात आली असून त्याचे ऑनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध झाले आहेत. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना दरमहा २५ हजार रुपये (फेलोशिप) विद्यावेतनासह नियमित पीएच.डी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्णवेळ राबविल्या जाणाऱ्या या शिक्षणक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्यांना २७ एप्रिल २०१५ पर्यंत अर्ज करता येतील.
प्रदीर्घ कालावधीनंतर मुक्त विद्यापीठाने संशोधनाला चालना मिळाली आहे. विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला. पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा (पेट) १० मे २०१५ रोजी होणार आहे. परीक्षेच्या नोंदणीसाठीपाचशे रुपये शुल्क असून परीक्षार्थींना ५ मे रोजी विद्यापीठ संकेतस्थळावर हॉल तिकीट उपलब्ध होतील. १० मे रोजी परीक्षा झाल्यानंतर १५ मे रोजी निकल घोषित करण्यात येतील. त्यानंतर २० मे रोजी उमेदवारांच्या तोंडी परीक्षा घेण्यात येतील. १५ जूनला अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान निवड यादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांना १८ जून पर्यंत नोंदविता येतील.
प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपले संशोधन कार्य विद्यापीठात संबंधित विद्याशाखेत पूर्णवेळ थांबून करावयाचे आहे. संशोधक विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये दरमहा विद्यावेतन (फेलोशिप) दिली जाणार आहे. यावर्षी पीएच.डीसाठी विविध विद्याशाखांच्या ४६ जागा उपलब्ध आहेत. त्यात विद्यापीठाच्या कृषिविज्ञान विद्याशाखेच्या जागा अधिक आहेत. तर त्याखालोखाल वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि शिक्षणशास्र विद्याशाखेच्या जागा आहेत. परीक्षेची अधिक माहिती आणि प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या http://ycmou. digitaluniversity.ac/phd-2015 संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

