सत्तेत वाटा मिळाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल - खा. रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सत्तेत वाटा मिळाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल - खा. रामदास आठवले

Share This
मुंबई : मला मंत्रीपद मिळाले नाही तरी काही फरक पडणार नाही. जनतेचे माझ्यावरील प्रेम कमी होणार नाही, भाजपाने लेखी आश्‍वासन देऊन आम्हाला फसवले असल्याचे सांगत सत्तेत वाटा मिळाला नाही, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी रविवारी दिला. वांद्रे-कुर्ला संकुल येथील रिपाइंच्या राज्यव्यापी अधिवेशनात आठवले बोलत होते. रिपाइंचे खास अँण्ड्राईड अँपचे अध्यक्ष आठवले यांच्या हस्ते या वेळी उद््घाटन करण्यात आले.

भाजपा-शिवसेना महायुतीत सामील असलेल्या आठवले यांनी आपल्या भाषणात थेट भाजपावर टीका करण्याचे टाळले. मात्र, गोवंश हत्याबंदीच्या कायद्याला थेट विरोध केला. गो हत्याबंदी चालेल. लहान रेडूक मारायला बंदी घाला; पण गोवंश हत्याबंदीचा कायदा नको. आमचा त्याला विरोध आहे, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी भाजपाला बजावले. जर बैल कामाचा नसेल तर त्याला पोसणे शक्य नाही. हा आर्थिक प्रश्न आहे. जगात कुठे असा कायदा नाही. भाजपाची सत्ता असलेल्या गोव्यात हा कायदा रद्द केला आहे. तेथे फक्त गो हत्याबंदी कायदा आहे, याची आठवण करून देत आठवले यांनी भाजपाच्या महत्त्वाकांक्षी कायद्याला तीव्र विरोध केला. रिपाइं हा फक्त बौद्धांचा पक्ष नाही. जो जो या देशाचा नागरिक आहे तो पक्षाचा सभासद होऊ शकतो. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना पक्षात स्थान देणार आहे. यापुढे रिपाइं पक्षात अन्य समाजाच्या ५0 टक्के लोकांना पद देण्यात येईल. तसेच निवडणुकीत ५0 टक्के जागांवर अन्य समाजाला उमेदवारी देणार असल्याचे ते म्हणाले. हिंदी चित्रपटातील अभिनेता हेमंत बिर्जे यांनी या वेळी रिपाइंमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष सचिन मरगड आणि अरुणा मरगड यांनीही पक्षात प्रवेश केला. अधिवेशनात निवृत्त सनदी अधिकारी आणि रिपाइंचे राष्ट्रीय महासचिव उत्तम खोब्रागडे, सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते. 
रिपाइं अधिवेशनात १७ ठराव पारित
इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम सुरू करावे व चैत्यभूमीसमोर अरबी समुद्रात आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारावा आणि लंडन येथील स्मारकाचे कामकाजही पूर्ण करावे, या प्रमुख ठरावासह भाजपाने केंद्रात आणि राज्यात रिपाइंला सत्तेत सहभाग द्यावा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद द्यावे, झोपू योजनेसाठी पात्रतेची र्मयादा २0१४ पर्यंत करावी, असाही ठराव संमत करण्यात आला. वाढत्या महागाईला आळा घालावा, जीवनावश्यक गोष्टींचे भाव स्थिर ठेवावेत, दलितांवर अत्त्याचार, दलित व इतर सर्व महिलांवरील अत्याचार तसेच लहान मुलींचे शोषण रोखण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना राबवावी, गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध करणारा आणि गोहत्या बंदीचा कायदा असावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. राज्यातले सगळे टोलनाके बंद करून राज्य टोलामुक्त करावे, भूमिहीन शेतमजुरांना जमिनींचे वाटप करण्यात यावे, झोपडपट्टी संरक्षण कायदा आणून एसआरए योजनेसाठी पात्रतेची र्मयादा २0१४ करावी, प्रत्येक झोपडीधारकाला किमान ४00 चौरस फुटांचे घर मिळावे, तसेच ही योजना मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रात लागू करावी, शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, शेतमजुरांना ४00 रुपये किमान वेतन देण्यात यावे, मागासवर्गीय महामंडळांना निधी वाढवून मिळावा, बेरोजगार भत्ता देण्यात यावा, वीज निर्मितीचे प्रकल्प उभे करावेत, खाजगीकरणाला विरोध आणि मुंबई विकास आराखड्यामधे गरीब, दुर्बल घटकांना सामावून घ्यावे, असे एकूण १७ ठराव या अधिवेशनात पारित करण्यात आले.

Displaying RPI-00.jpg
Displaying rpi-03.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages