मुंबई : पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात मागासवर्गीयावर अन्याय अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. नगर जिल्ह्यातील नेवासे येथे पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली आहे. बहिष्कृत पारधी कुटुंबाने या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस यंत्रणेने न्याय न दिल्याने अखेर आझाद मैदानात पारधी कुटुंब गेल्या महिनाभरापासून ठाण मांडून बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला न्याय द्यावा अशी अपेक्षा ठेवत या बहिष्कृत कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे. परंतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंदोलनकर्त्यांना भेटायला वेळ नाही, या प्रकरणात मुख्य सचिवांनी या पारधी कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याचे पत्र नगर जिल्हाधिकार्यांना पाठवले होते. मात्र, या पत्रालाही केराची टोपली दाखवल्याने आम्हाला न्याय कोण देणार असा प्रश्न काळे कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावात सुभाष काळे आपल्या नातेवाईकांच्या १0 कुटुंबासह राहतात. सुभाष काळे यांची मुलगी बाली सुभाष काळे (१४) आणि मुलगा विकी सुभाष काळे (१५) यांना काही कारण नसताना गावातील काही लोकांनी जागा सोडण्याची धमकी दिली. मात्र, यास विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न किशोर मारुती नवले याने केला. या विरोधात काळे यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत काळे यांच्या पत्नी आणि इतर नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावयास गेल्यास काळे यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. शेवटचा पर्याय म्हणून काळे यांनी न्यायालयात धाव घेतली आणि त्याच दिवसापासून गावकर्यांनी काळे कुटुंबीयावर बहिष्कार टाकला. त्यामुळे भयभीत झालेल्या काळे कुटुंबीयांनी गावच सोडले आहे. आझाद मैदानात गेले महिनाभर काळे कुटुंबीय उपोषणाला बसले आहेत. आपल्या कुटुंबासह दिवसभर उन्हात उपोषण करून रात्री दग्र्यात मिळालेल्या भोजनावर गुजराण करण्याची वेळ काळे यांच्यावर आली आहे. आपल्या मूळच्या गावी जाण्याचा धसका काळे कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यामुळे आमचे पुनर्वसन पुण्यातील मावळ तालुक्यात करावे, अशी मागणी काळेंनी केली आहे
