अंध विक्रेत्यांचे रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंध विक्रेत्यांचे रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Share This
मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकलमधील अंध फेरीविक्रेत्यांना बूटपॉलिश विक्रेत्यांप्रमाणेच रेल्वे प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, रेल्वे व्यवस्थापनाने अंध विक्रेत्यांना प्रत्येक रेल्वे स्थानकावर जागा नेमून द्यावी, आदी मागण्यांसाठी मुंबईच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या आणि लोकलमधील फेरीविक्रेत्यांनी सोमवारी दादर पूर्वेकडील रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यामध्ये सुमारे ५00 विक्रेत्यांचा सहभाग होता, असा दावा 'ब्लाइंड पिपल्स असोसिएशन'चे (बीपीए) अध्यक्ष सुहास कर्णिक यांनी केला.गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अंध विक्रेत्यांवर विविध अत्याचार करून त्यांना हा व्यवसाय करू देत नाहीत, असा आरोप कर्णिक यांनी केला. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या दादर येथील कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.


रेल्वे सुरक्षा बलाद्वारे होणारे अत्याचार त्वरित बंद करावेत, भारतीय रेल्वे कायद्याच्या पोट नियम १४४ मध्ये बदल करून अंध विक्रेत्यांचा अपवाद केला जावा आणि त्यांना व्यवसायासाठी परवाने आणि ओळखपत्रे द्यावीत, सुशिक्षित अंध विक्रे त्यांना रेल्वेने अपंगांच्या १९९५ च्या कायद्यात नमूद केल्यानुसार एक टक्के आरक्षण देऊन नोकरी द्यावी, राज्य आणि केंद्र सरकारने अपंगांच्या कायद्यात नमूद केल्यानुसार त्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी बेरोजगार भत्ता द्यावा, अशा मागण्याही धरणे आंदोलनात केल्या. एक टक्के आरक्षण देऊन नोकरी द्यावी, अशी तरतूद असूनही त्यांना रेल्वेत नोकरी नाकारली जाते, असे कर्णिक म्हणाले. या धरणे आंदोलनात 'एनएफबी'चे प्रकाश पंडागळे, सक्षमचे रमेश सावंत, जयहिंद ऑर्गनायझेशनचे प्रकाश भराडे, प्रगती अंध अपंग ट्रस्टचे विष्णू सकपाळ, मौसमचे सय्यद शेख आणि 'नॅशनल ब्लाइंड असोसिएशन' (नॅब)च्या पल्लवी कदम आदी सहभागी झाले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages