मुंबई / अजेयकुमार जाधव
दहिसर नदी येथील भींतीचे काम करताना पाण्याची पाइप लाइन फोडून लाखो लिटर पाणी वाया घालवणाऱ्या मे. टेन योगेश या कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे.
दहिसर नदी येथे जुन्या झालेल्या दगडी संरक्षक भींतीच्या जागी नवीन भींत बांधण्याचे काम सुरु असताना कंत्राटदाराने जमीनी खालील पाण्याची पाइपलाइन दोन दिवसापूर्वी फोडली होती. पाइपलाइन फुटल्यामुळे विभागातील नागरिकांना दोन दिवस पाणी पुरवठा झाला नव्हता. याची माहिती पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांना कळताच त्यांनी घटना स्थळाला भेट देवून पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पाठपुरवा केला. यावेळी आंबेरकर यांनी जल विभागाचे अभियंता रमेश बांबळे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी जबाबदारी झटकत संचालक लक्ष्मण व्हटकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगीतले. व्हटकर यांनी पाणी पुरवठा पूर्ववत केल्याचे सांगीतले मात्र कंत्राटदारावर का्य कारवाई केली याची माहिती दिली नाही. मे. टेन योगेश या कंत्राटदाराने लाखो लिटर पाणी वाया घालवल्याने कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी आंबेरकर यांनी केली आहे.

