मुंबई दि 6 – मुंबईतील इंदूमिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे म्हणून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली कामगार नेते विजय कांबळे, आमदार भारती लव्हेकर, मनीषा चौधरी आणि अन्य पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे इंदुमीलवर स्मारक व्हावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. यासर्व आंदोलनकर्त्यांची स्मारक व्हावे हीच भूमिका होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल केले. हे गुन्हे सरकारने मागे घ्यावे अशी विनंती या शिष्टमंडळाने केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.
