नाशिक : विविध विषयांत संशोधन करू इच्छिणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना संशोधन कार्यात संदर्भ साहित्य म्हणून वापरण्यासाठी युजीसी इन्फोनेटच्या माध्यमातून सुमारे ८ हजार ५०० इलेक्ट्रोनिक जर्नल्स इंटरनेटद्वारा उपलब्ध आहेत. त्यापैकी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सुमारे ४ हजार ५०० नियतकालिकांची उपलब्धी करण्यात आली असल्याचे इन्फ्लीबनेट केंद्राचे संचालक डॉ. जगदीश अरोरा यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील यश इन येथे युजीसी इन्फोनेट प्रोगामचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. जगदीश अरोरा बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरंतर विद्याशाखेचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे हे होते.
संशोधन आणि विविध शैक्षणिक कार्यात या नियतकालिकांची उपलब्धी, वापर आणि हाताळणी याबाबत विस्तृत विश्लेषण यासारख्या सेवा पुढे विद्यापीठाच्या विविध अभ्यासकेंद्रांनादेखील देता येतील असे आश्वासन अरोरा यांनी याप्रसंगी दिले. या विविध उपक्रमांचा विद्यापीठास कुलगुरू प्रा .डॉ. माणिकराव सांळुखे यांच्या मार्गदर्शनातून समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल असा विश्वासही अरोरा यांनी या वेळी व्यक्त केला. कार्यक्रमास नाशिक विभागातील विविध शैक्षणिक संस्थांचे ग्रंथपाल, विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
