म्हाडाची बनावट वेबसाईट बनवणारा अटकेत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडाची बनावट वेबसाईट बनवणारा अटकेत

Share This
मुंबई : म्हाडाच्या वेबसाईटप्रमाणेच बनावट वेबसाईट बनवून म्हाडा व जनतेची फसवणूक करणारा अभियंता राजेशकुमार तिवातिया (२७) याला सायबर पोलिसांनी अटक केली. म्हाडाच्या या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून गुगलकडून जाहिराती मिळवून त्यापोटी आठवड्याला तो दीड लाखांची कमाई करत होता. अशा प्रकारे इतर राज्यांतील अशा अनेक संस्थांच्या ७0 वेबसाईट आरोपी राजेशकुमारने बनवल्याचे उघड झाले आहे.

म्हाडाच्या वेबसाईटसारखीच म्हाडाची बनावट वेबसाईट अज्ञात इसमाने बनवून तो म्हाडाची व जनतेची फसवणूक करत असल्याप्रकरणी म्हाडाच्या वतीने बीकेसी, सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून हरयाणातील बीटेक असलेला अभियंता राजेशकुमार याला अटक केली. त्याच्या दुसर्‍या एका साथीदाराची चौकशी सुरू असून, तो दिल्लीतील उपनिरीक्षकाचा मुलगा आहे. ज्या वेबसाईटला अधिक क्लिक मिळतात म्हणजे ते पाहिले जाते त्या वेबसाईटला गुगलकडून जाहिराती मिळतात. त्यात त्याला प्रत्येक क्लिकवर ६८ ते १00 रुपये मिळतात. अशा प्रकारे राजेशकुमारने म्हाडाची बनावट वेबसाईट बनवून आठवडाभरात दीड लाखांची कमाई केल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) के. एम. एम. प्रसन्ना यांनी सांगितले. राजेशकुमारने गेल्या वर्षीदेखील अशाच प्रकारे म्हाडाची वेबसाईट बनवली होती. त्या वेळीदेखील त्याने या वेबसाईटच्या माध्यमातून पैसे कमवले होते. दोन दिवसांपूर्वी राजेशकुमारला वर्तमानपत्रातील बातम्यांवरून म्हाडाच्या बनावट वेबसाईटप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजले. आपण स्वत: पोलिसांसमोर हजर झालो तर आपल्यावर पोलीस संशय घेणार नाहीत, अशा प्रकारे अतिहुशारी दाखवत राजेशकुमार गुरुवारी सकाळी विमानाने मुंबईत दाखल झाला. त्याने विमानतळावरूनच बीकेसी सायबर सेल पोलिसांशी संपर्क साधून पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याच्याकडे चौकशी करून त्याला आम्ही या प्रकरणात अटक केली, अशी माहिती सायबर सेल पोलीस ठाण्याचे सुनील घोसाळकर यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages