मुंबई मध्ये सध्या स्वाईन फ्ल्यू या आजाराने जोरदार हात पाय पसरले आहे. फेब्रुवारी मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या १९ जानेवारी २०१५ पासून या आजाराचे रुग्ण मुंबईमध्ये मिळत आहेत. जानेवारी पासून स्वाईन फ्ल्यूचे मुंबई मध्ये रुग्ण मिळत असले तरी ते मुंबई बाहेरून मुंबई मधील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत होते. फेब्रुवारी मध्ये मात्र मुंबई मधील नागरिकांना हा आजार झाल्याचे निष्पन्न झाल्यावर पालिका खडबडून जागी झाली होती. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पालिकेने आम्ही आजारांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहोत याबाबतची माहिती पत्रकारांना देण्यात आली होती.
मुंबई महानगर पालिकेच्या सर्व रुग्णालयात व्हेन्टीलेटर सज्ज ठेवण्यात आली आहेत, ट्यामी फ्ल्यू गोळ्यांचा साठा राज्य सरकारकडून मिळाल्याचे सांगण्यात आले होते. मुंबईकर नागरिकांनीही या आजाराला भिऊ नये असे आवाहन करण्यात आले होते. अशीच पत्रकार परिषद फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा घेण्यात आली तेव्हाही पालिकेने आम्ही सज्ज आहोत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असा दावा केला होता. पालिकेने केलेल्या दाव्या नंतर पालिका खरोकहरच स्वाईन फ्ल्यूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असेल असे वाटले होते. परंतू नेमके त्याच्या उलट होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मुंबई महानगर पालिका फेब्रुवारीला पहिल्या पत्रकार परिषदे पासून स्वाईन फ्ल्यूची एक आकडेवारी सादर करत आहे. या आकडेवारी नुसार १९ जानेवारी पासून ४ एप्रिल २०१५ पर्यंत स्वाईन फ्ल्यूचे मुंबई मधून १६२१ तर मुंबई बाहेरील २२० रुग्ण असे एकूण १८४१ रुग्ण आढळले आहेत. या पैकी मुंबई मधील १८ तर मुंबई बाहेरील ३० रुग्णांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. हि आकडेवारी पालिका देत असल्यामुळे लोकांना यावर विश्वास ठेवावा लागत असला तरी हि खरी आकडेवारी आहे का यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.
कारण २२ फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्वाईन फ्लूचे मुंबई मधील २४० रुग्ण आढळले होते त्यावेळी मुंबई मधील १ रुग्ण मृत झाला होता. याच दिवशी मुंबई बाहेरील १ रुग्ण आढळल्याने मुंबई बाहेरील ७२ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई बाहेरील २४ फेब्रुवारीला १, २५ फेब्रुवारीला १, २६ फेब्रुवारीला २, २७ फेब्रुवारीला १ अश्या ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १७ झाली होती. मुंबई बाहेरील १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे २७ फेब्रुवारी पासून २ मार्च पर्यंत आकडेवारी सादर करण्यात येत होती. परंतु ३ मार्च पासून ८ मार्च पर्यंत हि आकडेवारी बदलून १७ मृत्यूंच्या ऐवजी १३ रुग्ण मृत्यू पावल्याची आकडेवारी सादर करण्यात येत होती.
९ मार्च आणि १० मार्चला मुंबई बाहेरील पुन्हा दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने अद्याप १५ मृत्यू दाखवण्यात येत होते. वास्तविक पाहता मुंबई बाहेरील अद्याप १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई मधील ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिका ३ मार्च पासून सादर करत असलेल्या आकडेवारीवरून मुंबई मधील ७ आणि मुंबई बाहेरील १५ अश्या एकूण २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगत असली तरी मुंबई मधील ७ आणि मुंबई बाहेरील १९ अश्या एकूण २६ रुग्णांचा स्वाईन फ्लू मुळे त्यावेळी म्र्त्यू झाला होता असेच म्हणावे लागेल.
हि आकडेवारी खोटी असल्याबाबतची बातमी दैनिक जनतेचा महानायक मध्ये १३ मार्च २०१५ रोजी प्रसिद्ध झाली होती. यावेळी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या एक वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने फोन करून ५ रुग्ण स्वाईन फ्लूचे नसल्याने त्या आकडेवारी मधून त्या ५ जणांना वगळण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. पालिकेच्या आकडेवारी नुसार त्या वेळी १७ रुग्ण मृत्यू पावले होते ५ जणांना त्या मधून वगळल्यावर त्यांची संख्या १२ होते परंतु पालिकेची आकडेवारी मात्र १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगत होती. यावरूनच आकडेवारीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.
एकीकडे पालिकेचा आरोग्य विभाग ज्या मुंबईकर जनतेच्या कर रुपी पैश्यातून पगार घेत आहे. त्यांना मुंबईकर नागरिकांची काहीही पडली नसल्याचे दिसत आहे. मुंबईकर जनतेची चांगली काळजी घेण्यासाठी आणि चांगल्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी आपली नेमणूक केली आहे याचा विसर आरोग्य विभागाला पडला आहे. पालिका प्रशासनातील आरोग्य विभागाप्रमाणेच आरोग्य समितीच्या अध्यक्षा असलेल्या गीता गवळी यांचेही मुंबईकर नागरिकांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी स्वाईन फ्लूच्या काळात एकही रुग्णालयाला भेट दिलेली नाही. नुसती प्रसिद्धी पत्रके काढण्यात धन्यता मानली आहे. यावरून आरोग्य समितीच्या अध्यक्षांना मुंबईकर नागरिक विविध आजारांनी मोठ्या संखेने मृत्यूमुखी पडत असले तरी काहीही देणे घेणे नाही असेच दिसत आहे.
मुंबईत
डेंग्यूचे
२०१० मध्ये ११५ रुग्ण होते त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०११ मध्ये ४१६ रुग्ण होते त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१२ मध्ये १००८ रुग्ण होते त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१३ मध्ये ९२७ रुग्ण होते त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०१४ या वर्षी ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
२०११ पासून २०१४ पर्यंत मुंबईत डेंग्यूमुळे तब्बल ५२ रुग्ण दगावले आहेत. डेंग्यू या आजाराने जितके रुग्ण गेल्या ४ वर्षात मृत झाले त्या पेक्षा जास्त मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या दोन महिन्यात झाले आहेत. २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात १९५ जण मलेरियाने मृत्युमुखी पडले आहेत. प्रजा फाऊंडेशनच्या च्या आकडेवारी नुसार मुंबई मध्ये टीबीचा आजार जास्त भयानक बनला आहे. मुंबईच्या रुग्णालयात रोज टीबीचे सरासरी ६ रुग्ण दाखल होत असून दररोज ६ जणांचा म्र्त्यू होत आहे. मुंबई मध्ये गेल्या ( २०१४ ) वर्षभरात ७०७५ जणांचा टीबीमुळे मृत्यू झाला आहे. हे प्रमाण म्हणजे दर रोज २० रुग्णांचा टीबीमुळे मृत्यू झाला आहे. मुंबई मध्ये एकूण मृत्यू पडणाऱ्यापैकी ३० ते ४० टक्के लोकांचा टीबीमुळे मृत्यू होत आहेत. राज्य आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार मुंबई सह राज्यात डिसेंबर २०१४ मध्ये ११ हजार १५५ टीबीच्या रुग्णांची नोंद झाली त्या पैकी ६१५ जणांचा टीबीमुळे मृत्यू झाला आहे. जानेवारी २०१५ मध्ये १० हजार ४२७ टीबी रुग्णांची नोंद झाली असून ६१० जणांचा टीबीमुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत एप्रिल, २०१३ ते मार्च, २०१४ या वर्षात ७६५० जणांचा अनावश्यक मृत्यु झाला. म्हणजे टीबी, मलेरिया, अतिसार, टायफॉइड अशा उपचार होणाऱ्या आजारांमुळे या लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच या सर्वांचा अनावश्यक मृत्यू झाल्याचा दावा प्रजाने केला आहे. मुंबईकरांमधील ताण वाढत असून एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या काळात ४५२५ लोकांचा अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा 'प्रजा'ने केला आहे. या मृत्यूची पालिकेने जबादारी घेण्याची गरज आहे. मुंबईकर नागरिकांना चानागल्या सुविधा दिल्यास मृतांची हि आकडेवारी कमी करता येवू शकते. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईकर जनतेला चांगल्या सोयी सुविधा दिल्यास चांगले उपचार दिल्यास मृत्यूची आकडेवारी कमी करता येवू शकते.त्यासाठी मुंबईच्या महापौर, पालिका आयुक्त, आरोग्य समितीच्या अध्यक्षा, पालिकेचा आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो.९९६९१९१३६३
.jpg)

No comments:
Post a Comment