मुंबई, शनिवार (प्रतिनिधी)- घाटकोपर येथील पालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका 21 वर्षीय तरूणीचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यु झाला आहे. याघटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.
घाटकोपर येथील लायन्स म्युनिसिपल स्विमिंग पुल येथे आईसोबत पोहण्यासाठी गेलेल्या काचंन रोडे या तरूणीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोहण्यासाठी गेली होती. नेहमीसारखी पोहण्यासाठी ती पाण्यात उतरली. दोन फेऱ्या तिने पार केल्या. मात्र, तिसऱ्या फेरीला ती पाण्यात बुडू लागली. हा प्रकार तेथील काही लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर स्विमींग प्रशासनाच्या मदतीने बाहेर काढली. तिच्या नाकातोंडात पाणी गेल्याने पाठीवर दाब देवून पोटातील पाणी बाहेर काढण्यात आले. मात्र, ती शुध्दीवर न आल्याने तीला राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ती मृत्यु झाल्याचे सांगितले. दरम्यान, सदर तरूणीला फिट आल्यामुळे तिची बुडून मृत्यू झाला, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
