मुंबई, प्रतिनिधी - रिपब्लिकन पक्षाने आज चैत्यभूमी ते इंदूमिल अशी विजयी मिरवणूक काढून इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी राज्य सरकारला हस्तांतर करण्याच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. पक्षाध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या आतषबाजीत ही मिरवणूक काढण्यात आली. पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे, सिध्दार्थ कासारे, युवराज सावंत, सचिन मोहिते, चंद्रशेखर कांबळे व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कॉंग्रेसने सत्ता असताना जागा देण्याचा निर्णय घेतला मात्र जागा हस्तांतर करण्यात विलंब केला त्यामुळे आता त्यांना प्रतिकात्मक भूमिपूजन करावे लागत आहे, कॉंग्रेस या मुद्द्यावर राजकारण करण्याचा व श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आठवलेंनी केला. चैत्यभूमी व इंदू मिल समोरील समुद्रात बाबासाहेब यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. कॉंग्रेसने नेहमी दलितांची मते वापरुन घेतली मात्र त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे आगामी काळात त्यांना दलित समाजाची मते मिळणार नाहीत, असा दावा आठवले यांनी केला.

.jpg)