मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीत शिवसेना पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून निवड केलेल्या प्रमोद शिंदे यांनी शिक्षक म्हणून एका विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. तसेच त्यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नसल्याने शिंदे याना शिक्षण समिती पदावरून वरुन काढून टाकावे अशी मागणी इंडियन एजुकेशन सोसायटीने महापौर व् पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
प्रमोद शिंदे हे पलिकेकडून अनुदान मिळणाऱ्या इंडीयन एजुकेशन सोसायटीच्या पाटकर गुरूजी विद्यालयात प्राथमिक विभागात शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. नोकरीवर असताना शिंदे यांनी शाळेची किंवा संस्थेची परवानगी न घेता पालिकेच्या शिक्षण समितेचे सदस्य पद मिळवले आहे. गेले 7 वर्षे शिंदे हे शिक्षण समितीवर स्वीकृत सदस्य आहेत. शिक्षण समितीचे सदस्य असताना शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात श्रीशांत राजू गांगुर्डे या विद्यार्थ्याला मारहाण केली होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी कारवाई करू नका असे सांगीतल्याने शिंदे याना समज देवून पोलिसांनी सोडून दिले होते. शाळेमध्ये नोकरी करत असताना शिंदे यांनी शाळेला व संस्थेलाही गोत्यात आणले आहे. याची गंभीर दखल शिंदे यांना शिक्षण समिती सदस्य पदावरून काढून टाकावे अशी मागणी संस्थेने केली आहे. यासाठी संस्थेने सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्ष नेते देवेन्द्र आंबेरकर, शिक्षण समिती अध्यक्ष रितु तावडे यांची भेट घेवून लेखी निवेदन दिले आहे.

