महाराष्ट्रात तीन महिन्यात २५७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्रात तीन महिन्यात २५७ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Share This
नवी दिल्ली : महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत विविध कृषी कारणांमुळे २५७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी राज्यसभेत दिली. त्यापैकी सर्वाधिक ११४ शेतकर्‍यांच्या आत्महत्या औरंगाबाद विभागात झाल्या आहेत.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत बोलताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी महाराष्ट्रात अवकाळी आणि गारपिटीमुळे ३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. हीच माहिती शुक्रवारी कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी राज्यसभेत दिली. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या अहवालानुसार नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. तर शेतीशी संबंधित विविध कारणांमुळे महाराष्ट्रात २५७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

चालू वर्षातील पहिल्या तीन महिन्यांची ही आकडेवारी आहे. २५७ पैकी आत्महत्येच्या सर्वाधिक ११४ घटना औरंगाबाद विभागात झाल्या आहेत. त्याखालोखाल अमरावतीत १0२, नागपूरमध्ये ३0 आणि नाशिकमध्ये ९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा तसेच पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे मृत्यूला कवटाळणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात आल्याची माहिती कुंदरिया यांनी दिली.

कृषी क्षेत्र हे राज्य सरकारच्या अधीन असून शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आणि शेतीच्या विकासासाठी संबंधित राज्य सरकार आवश्यक उपाययोजना करत असल्याचे कृषी राज्यमंत्र्यांकडून राज्यसभेत सांगण्यात आले. शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासह कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार पावले उचलत असल्याचेही ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages