मुंबई : एमएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभागा (पीडब्लूडी)ने बांधलेले मुंबईतील महत्त्वाचे रस्ते पालिका आपल्या ताब्यात घेणार आहे. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी दुसर्यावर ढकलण्याच्या वृत्तीमुळे राज्य सरकारने वरिष्ठ पातळीवर याबाबतचा निर्णय घेतला आहे. पालिकेने या वृत्तास दुजोरा दिला आहे, मात्र याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला नाही.
एमएमआरडीएने पूर्व मुक्त महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि मुंबईतील काही उड्डाणपूल उभारले आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. रस्त्यावर पडणार्या खड्डय़ांबाबत तक्रार कोणास करायची यावरून नागरिकांमध्ये निर्माण होणारा संभ्रम आणि पालिकेच्या ताब्यात रस्ते दिल्यास त्यांचा दर्जा सुधारेल, असे यामागील मुख्य कारण आहे. पालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांनी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, मीलन उड्डाणपूल, पूर्व मुक्त महामार्ग दुरुस्ती कामासाठी पालिका ताब्यात घेणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधीन येणार्या रस्त्यांचा दर्जा चर्चेचा विषय राहिला आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवर पडणारे खड्डे मुंबईकरांच्या नेहमीचे झाले आहे. त्यामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच पूर्व मुक्त महामार्ग दुरुस्तीसाठी पालिकेच्या ताब्यात दिल्यास त्यांचा दर्जा योग्य राखता येईल का? असा सवाल निर्माण होत आहे.

