मुंबई ( प्रतिनिधी ) - दुर्बल आणि वंचित घटकाला शिक्षण घेता यावे म्हणून शिक्षण कायद्यात २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. मात्र या कायद्याला पायदळी तुडवून प्रवेश नाकारणार्या सेंट अँथोनी शाळेच्या मनमानी कारभाराचा जाब विचारण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी बुधवारी जोरदार निदर्शने केली.
सर्व शिक्षण अभियानांतर्गत समाजातील दुर्बल वंचित समाजाला खाजगी शाळेत २५ टक्के आरक्षण आहे. कायद्यांतर्गत समाजातील दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना मोफत शिक्षण दिले जावे अशी तरतूद आहे. प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे ऑनलाईन राबवून पालकांना शाळेचे प्रवेशपत्र दिले गेले आहे. धारावीतील पालक आपल्या पाल्याला सेंट अँथोनी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत; परंतु सेंट अँथोनी ही शाळा मागील तीन वर्षांपासून अशा प्रकारचे प्रवेश नाकारत आहे. त्यामुळे सहनशिलतेचा अंत झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने केली.

