राखीव २५ टक्‍के प्रवेश प्रक्रियेत पालिका पुन्हा अपयशी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राखीव २५ टक्‍के प्रवेश प्रक्रियेत पालिका पुन्हा अपयशी

Share This
४,०८९ ऑनलाईन अर्जांना मंजुरी - ३,६१६ अर्धवट अर्ज रद्द 

मुंबई : अजेयकुमार जाधव 
केंद्र शासनाच्या शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गत दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्‍के जागांमधून प्रवेश देण्यात पालिकेला गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी अपयश आले आहे. याही वर्षी पालिकेकडे प्रवेश प्रक्रीयेसाठी एकूण जागांपैकी अर्धेच ऑनलाईन अर्ज आले आहेत. राखीव ११ हजार ८३७ जागांसाठी फक्‍त ४,०८९ योग्य रित्या भरलेले अर्ज मंजूर करण्यात आले असून तब्बल ३,६१६ अर्धवट असलेले अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामुळे पालिका राबवत असलेल्या प्रवेश प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. 


केंद्र शासनाच्या शिक्षण हक्‍क कायद्याने आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांत प्रवेशाचे गाजर दाखवले गेले आहे. याप्रक्रियेतून पळ काढण्यासाठी अनेक बड्या अल्पसंख्याक नसलेल्या शाळांनी आपला दर्जा अल्पसंख्याक करून घेत राखीव जागांच्या तरतुदीतून पळवाट काढली आहे. दर्जा बदलून घेणाऱ्या अशा शाळांची संख्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्षी राखीव प्रवेशपात्र शाळांची संख्या कमी झाली असून पालकांपुढील शाळांचे पर्याय कमी झाले. 

पालिकेने मोठा गाजा वाजा करत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या पालकांच्या सोयीसाठी २४ मार्गदर्शन केंद्रे उघडली होती. या कार्यालयातून राखीव कोट्यातून प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार होते. मागील वर्षी प्रवेश प्रक्रिया राबवताना ज्या चुका झाल्या त्या चुका या वर्षी होणार नाही, आम्ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी पूर्ण तयार असल्याचे पालिकेने सांगितले असले तरीही तब्बल ३ हजार ६१६ अर्ज अर्धवट असल्याने रद्द झाले आहेत. पालिकेकडे नोंद केलेल्या शाळांपैकी ३ किमी परिसरातील अनेक खासगी शाळा पालकांना पसंत पडलेल्या नाहीत. त्यामुळे हजारो पालकांना पालिकेकडे नोंद केलेल्या शाळांचाच पर्याय उपलब्ध असल्याने अश्या शाळांसाठीच अर्ज भरावे लागले असून या शाळांमधूनच प्रवेश दिले जाणार आहेत. 

अर्धवट भरलेल्या अर्जांची संख्या ३ हजार ६१६ आहे. हे सर्व अर्ज मंजूर करून प्रवेश प्रक्रिया राबवली असती तर एकूण अर्जांची संख्या ७ हजारांवर गेली असती. मुंबईमध्ये ३१३ शाळांमध्ये राखीव कोट्यातून प्रवेश देण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. त्यापैकी २६६ शाळा इंग्रजी, तर ४७ शाळा प्रादेशिक माध्यमांच्या आहेत. ४२ शाळा आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या आहेत.
अर्ज 
एकूण जागा - ११,८३७
एकूण अर्ज- 7,705
पात्र अर्ज- 4,089,
रद्द अर्ज- 575
अर्धवट अर्ज- 3,616

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages