'शिववड्या'ला 'स्वाभिमान वड्या'ची टक्कर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'शिववड्या'ला 'स्वाभिमान वड्या'ची टक्कर

Share This
मुंबई : शिवसेनेच्या 'शिववड्या'ला नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नीतेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने 'स्वाभिमान वड्या'च्या माध्यमातून टक्कर देण्याचे जाहीर केले आहे. शिववड्याच्या ९0 टक्के गाड्या अमराठी लोक चालवत असल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे. 

मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने शिवसेनेने शिववडापावच्या गाड्या मुंबईमध्ये ठिकठिकाणी सुरू केलेल्या आहेत. मुंबईतील अनेक ठिकाणी नाक्या-नाक्यांवर शिववडापावच्या गाड्या दिसून येतात. शिवसेनेने मराठी तरुणांना विशेषत: शिवसैनिकांनाच या गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, शिवसेनेने शिववडापावच्या गाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक गाडीमागे दीड लाख रुपये उकळणे सुरू केले असल्याचा आरोप नीतेश राणे यांनी केला आहे. शिवसेनेने सुरू केलेल्या या गाड्या अनधिकृत असल्याचेही नीतेश राणे यांनी सांगितले. 

नीतेश राणे यांनी शिववडापावच्या गाड्यांबाबत माहिती अधिकारात पालिकेकडे माहिती मागितली होती. पालिका अधिकार्‍यांनी शिववडापावच्या गाड्यांना अधिकृत मान्यता नसल्याचे कळवले असल्याची माहिती आ. नीतेश राणे यांनी या वेळी दिली. आता शिवसेनेच्या शिववडापावच्या गाड्यांजवळच स्वाभिमान वड्याच्या गाड्या लावण्याचा निर्धार नीतेश राणे यांनी केला असून या माध्यमातून मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्याची योजना आखली आहे. मराठी तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीच 'स्वाभिमान वडा'ची योजना असल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages