दैनदिन पासाच्या दुप्पट दरवाढीमुळे बेस्टकडे अर्ध्या प्रवास्यांनी फिरवली पाठ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दैनदिन पासाच्या दुप्पट दरवाढीमुळे बेस्टकडे अर्ध्या प्रवास्यांनी फिरवली पाठ

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्टच्या प्रशासनामध्ये आर्थिक नियोजन व शिस्त नसल्याने बेस्ट परिवहन विभाग तोटय़ात जात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी बेस्टने सतत तिकीट दरात दर वाढ केली असली तरी हि दरवाढ बेस्टच्या मुळावर आली आहे. दैनंदिन तिकिटाचा ४० रुपये असलेला दर ७० रुपये झाल्याने तब्बल अर्ध्या प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवली आहे. फेब्रुवारी व एप्रिल या दोन महिन्यांत दोन वेळा बसच्या तिकिटात वाढ केल्याने बेस्टच्या महसुलात वाढ होत असताना प्रवाश्यांमध्ये आणि तिकीट विक्री मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने येणाऱ्या काळात महसुलावर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन विभागाने प्रथम २५ रुपयांचे दैनंदिन तिकीट सुरू केले होते. २५ रुपयांच्या दैनंदिन तिकिटाला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत होता. कालातंराने २५ रुपयांचे तिकीट बंद करून ४० रुपयांचे करण्यात आले. ४० रुपयांच्या दैनंदिन तिकिटालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला मात्र पुन्हा आर्थिक तूट भरून काढण्यासाठी दैनदिन तिकीट ७० रुपयांचे करण्यात आले आहे. दैनंदिन तिकीट ४० रुपये असताना ६० हजारांहून अधिक प्रवासी याचा वापर करत होते, मात्र १ एप्रिलपासून ४० रुपयांचे दैनंदिन तिकीट ७० रुपये झाले आणि प्रवाशांची संख्याही ३० हजारांवर आली. ७० रुपयांचे दैनंदिन तिकीट केल्यापासून बेस्टने दैनंदिन पास काढून प्रवास करणारे ३० हजार प्रवासी कमी झाले आहेत. या तिकीट दरवाढीमुळे बेस्टच्या महसुलात वाढ झाली असली तरी प्रत्यक्षात प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांत दोन वेळा दरवाढ केल्याने प्रवाशांनी बेस्ट प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages