कीटकजन्य रोगांमध्ये डेंग्यू, हिवताप घातक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कीटकजन्य रोगांमध्ये डेंग्यू, हिवताप घातक

Share This
मुंबई : राज्यात डेंग्यू व त्यानंतर हिवताप हे कीटकजन्य रोग जास्त घातक असल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूने २0१४-१५ मध्ये १२२ बळी घेतले असून हिवतापाने ५३ बळी घेतले आहेत. तर टीबीच्या संशयित रुग्णांची संख्या दर लाख लोकसंख्येमागे १९५ असली तरी रोगमुक्ततेचे प्रमाण हे त्या मानाने चांगले म्हणजे ८४ टक्के इतके आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून डिसेंबर २0१४ पर्यंत या योजनेंतर्गत एकूण १ लाख ९२ हजार ६५९ शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले असून त्यासाठी ४७0.३८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

हिवताप, हत्तीरोग, मेंदूज्वर, डेंग्यू, चिकनगुनिया, चंडीपुरा इत्यादी कीटकजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी तसेच रोगनिदान उपचार व नियंत्रणासाठी राज्यात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. डेंग्यूचे २0१३-१४ मध्ये ४१ हजार ६२२ रुग्ण आढळले तर त्यापैकी १२६ जणांचा मृत्यू झाला. २१0४-१५ मध्ये ही संख्या वाढली असून ५८ हजार ५९४ रुग्ण आढळले त्यापैकी १२२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हिवतापाचे २0१३-१४ साली ४१ हजार ८५९ रुग्ण आढळले त्यापैकी ७३ जणांचा मृत्यू झाला तर २0१४-१५ मध्ये ४७ हजार ८ रुग्ण आढळले त्यापैकी ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. हत्तीरोग, चिकनगुनिया, मेंदूज्वराचे रुग्ण आढळले असले तरी त्यापैकी सुदैवाने एकही रुग्ण दगावलेला नाही. चंडीपुराचे मात्र २0१३-१४ मध्ये ५ रुग्ण होते व ५ जणांचा मृत्यू झाला. २0१४-१५ मध्ये ५ रुग्ण आढळले असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एचआयव्ही बाधितांच्या प्रमाणात मात्र कमी झाली आहे. २0१0 साली तिन्ही चाचण्यांवरून एचआयव्ही बाधितांची संख्या ७१ हजार होती. २0११ मध्ये ५७ हजार २0१२ मध्ये ६१ हजार, २0१३ मध्ये ४६ हजार तर २0१४ मध्ये ती ३0 हजारांपर्यंत आली आहे. २0१४ मध्ये १७ हजार ४१७ एड्सरुग्ण होते तर २ हजार ३१८ रुग्णांचा एड्सने मृत्यू झाला आहे.

कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, विषमज्वर, लेप्टोस्पायरोसिस या साथीच्या तसेच अचानक उद्भवणार्‍या आजारांनी होणार्‍या मृत्यूंची संख्याही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येत आहे. २0१0-११ मध्ये साथरोगांनी २१0 जणांचा बळी घेतला होता. २0१४-१५ मध्ये बळींची संख्या २१ इतकी आहे. पोलिओच्या विषाणूचा प्रसार रोखण्यात मात्र राज्याने उत्तम प्रगती केली आहे. २0१0-११ नंतर पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे २७ मार्च २0१४ रोजी महाराष्ट्र व भारताला पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages