डॉ. आंबेडकरांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकारने खरेदी केले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकरांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकारने खरेदी केले

Share This
लंडन - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनयेथे वास्तव्य असलेले निवासस्थान महाराष्ट्र सरकारने खरेदी केले आहे. यासंबंधीचा व्यवहार मंगळवारी पूर्ण झाला. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रधान सचिव उज्ज्वल उके यांच्या उपस्थितीत ४० लाख पौंड (अंदाजे ४० कोटी रुपये) खाराचून या घराचा ताबा राज्य सरकारने घेतला आहे.

उत्तर लंडनमधील किंग हेन्रीज रोड येथील हे तीन मजली निवासस्थान आता राज्य सरकारतर्फे डॉ. बाबासाहेबांचे स्मारक म्हणून जतन केले जाणार आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत शिकताना डॉ. आंबेडकर १९२१-२२ या वर्षी या निवासस्थानी राहिले होते.'हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. हे आम्हा भारतीयांसाठी केवळ एक घर नाही, तर आमच्या भावभावना इथे जोडल्या गेल्या आहेत. हे निवासस्थान विकत घेण्यासंबंधीची सिद्धता झाली असून, अधिकृत खरेदी व्यवहाराला मे महिन्याअखेरीस मूर्त रूप येईल', असे बडोले म्हणाले.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याबाबतही बडोले यांनी संस्थेशी प्राथमिक चर्चा केली. असे अध्यासन संस्थेत सुरू झाल्यास तेथे शिकू इच्छिणाऱ्या दोन भारतीय विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दोन नव्या शिष्यवृत्तीही देण्याचा प्रस्ताव या वेळी चर्चिला गेला. लंडनमधील भारतीय दूतावास आणि भारताचे तेथील उपउच्चायुक्त डॉ. वीरेंदर पॉल आता पुढील प्रक्रियेचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. इमारतीवर 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, इंडियन क्रूसेडर फॉर सोशल जस्टिस' असा नीलफलक यापूर्वीच लावण्यात आला आहे. 


ambedkar-home

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages