व्हाट्सअपवर पालिकेच्या अब्दुल कलाम शिष्यवृत्तीचे खोटे संदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2015

व्हाट्सअपवर पालिकेच्या अब्दुल कलाम शिष्यवृत्तीचे खोटे संदेश

पालिकेची मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावाने मुंबई महानगर पालिकेने १० वी व १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु केली आहे असे संदेश सोशल मिडीयावरील व्हाट्सअप वरून फिरत आहे. असे संदेश मिळालेल्या लोकांनी थेट पालिका मुख्यालय गाठून विचारपूस केल्यावर अशी कोणतीही योजना पालिकेची नसल्याचे समोर येत आहे. यामुळे सोशल मिडियावरून पालिकेच्या नावाने खोटे संदेश पसरवले जात असल्याचे उघड झाले आहे. सोशल मिडीयावर पालिकेच्या नावे खोटे संदेश पाठवले जात असताना पालिकेने मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावे इयत्ता १० वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ७५ टक्क्याहून अधिक मार्क्स मिळाले आहेत त्यांना १० हजार रुपये आणि १२ वी मध्ये ८५ टक्क्याहून अधिक टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. अशी शिष्यवृत्ती मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अर्ज मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे संपर्क साधावा असा संदेश सध्या व्हाट्सअप वर फिरत आहे. हा संदेश मिळालेल्या व्यक्ती मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयात येवून विचारपूस करत आहेत. अब्दुल कलाम शिष्यवृत्तीची माहिती विचारण्यासाठी संपूर्ण पालिका मुख्यालय पालथे घालूनही या शिष्यवृत्तीची कोणतीही माहिती लोकांना मिळत नाही. पालिका मुख्यालयात सर्वत्र विचारपूस केल्यावर पालिकेची अशी कोणतीही शिष्यवृत्ती योजनाच नसल्याचे संबंधिताना कळत आहे.पालिकेची शिष्यवृत्ती असल्याचे भासवून लोकांना सोशल मिडियावरून खोटी माहिती पसरवली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

पालिका मुख्यालयात गेले काही दिवस एका शिष्यवृत्ती योजनेबाबतची माहिती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले आहे. अशी माहिती घेण्यासाठी आलेल्या लोकांना आम्ही मुख्यालयात पाठवत असलो तरी त्यांना अशी माहिती कुठे मिळते कि नाही हे आम्हाला माहित नसल्याचेही सुरक्षा रक्षकांनी सांगितले आहे. शिष्यवृत्ती योजना असल्याने पालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधल्यावर शिक्षण विभागानेही अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले आहे. यामुळे अशी योजन सुरु असल्याचे कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नसल्याने हे संदेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान पालिकेच्या नावाने एखादी योजन सुरु आहे असे सोशल मिडीयावर संदेश फिरत असल्याने लोकांची मात्र फसवणूक होत आहे. अशी फसवणूक होत असताना पालिकेच्या कोणत्याही विभागाने अद्याप या खोट्या संदेशांची दखल घेतलेली नाही. पालिकेच्या नावे फसवणूक केली जात असली तरी पालिकेने अशी योजना नसल्याचा कोणताही खुलासा केलेला नाही. इतकेच नव्हे तर सोशल मिडीयावर खोटे संदेश पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने काहीही पाऊले नसल्याने लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS