आरेचे खाजगीकरण नाही - मुनगंटीवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2015

आरेचे खाजगीकरण नाही - मुनगंटीवार

मुंबई : आरे दुग्धशाळेचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण होणार नाही, असे आश्‍वासन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका शिष्टमंडळाला दिले.
मनसेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुनगंटीवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आरेचे खाजगीकरण होऊ न देण्याची विनंती केली. प्रमोद म्हसकर, राजेश चव्हाण, नाटेकर आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. या वेळी शिष्टमंडळाने मंत्र्यांना एक निवेदनही दिले. पूर्वीच्या आघाडी सरकारने आरे दुग्धशाळेचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला होता. त्यांच्याच पावलावर हे सरकार पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे. हा शासकीय प्रकल्प नवे सरकार पुन्हा नावारूपाला आणेल, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. १९९0 दशकात आरेकडून १७ लाख लिटरपेक्षा जास्त दूध गोळा केले जात होते. आता हे प्रमाण एक लाख लिटरवर आले आहे. दूध, तूप, एनर्जी, श्रीखंड या आरेच्या उत्पादनांना बाजारात आजही मागणी आहे. आरेचे काम व्यावसायिक पद्धतीने होत नाही. खाजगी कंपन्या हे करू शकतात, तर शासकीय कंपन्यांना हे का जमत नाही, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. आरेचे स्टॉल राज्यात सर्वत्र आहेत. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो. आरेचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे आरेची अपेक्षित विक्री होत नाही. अशा वेळी हे स्टॉल सील करण्याची भाषा करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असल्याचा प्रकार आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी अलीकडेच आरेच्या स्टॉलचा गैरवापर होत असल्यास ते सील करण्याचा इशारा दिला होता. मुनगंटीवार यांनी या निवेदनातील मुद्दय़ांवर खडसे तसेच दुग्धविकास सचिव महेश पाठक यांच्याशी चर्चा केली आणि आरेचे खाजगीकरण केले जाणार नाही, असे आश्‍वासन दिले. आरेच्या स्टॉलधारकांच्या तसेच इतर संबंधितांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक बोलवण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS