मुंबईची दुसरी लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्टमधून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाश्यांना पकडण्यासाठी सातत्याने विशेष मोहीम राबवली जाते. या मोहिमेमधून फुकट्या प्रवाश्यांकडून लाखो रुपयांचा महसुल मिळत असला तरी फुकट्या प्रवाश्यांना रोखण्यास मात्र बेस्ट प्रशासनाला अपयश येत असल्याचे उपलब्ध आकडेवारी वरून दिसत आहे.
बेस्ट कढून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारी नुसार सन २०१५ मधील जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत २७ हजार फुकटया प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून २० लाख ३० हजार ८४७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बेस्टने मागील वर्षी सन २०१४ मध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये अशा फुकटय़ा प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईमध्ये २४ हजार ९२५ फुकटे प्रवासी पकडले होते. त्यांच्याकडून १७ लाख ४७ हजार ४२२ रुपये एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली होती. त्यानंतर सन २०१४ मध्ये पुन्हा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईमध्ये २८ हजार ५१२ फुकटे प्रवासी सापडले होते. त्यांच्याकडून २0 लाख २३ हजार ५ रुपये एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली होती. याआकडेवारीनुसार बेस्टकडून फुकट् या प्रवाश्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाताना बेस्टला दर ३ महिन्यांमध्ये १७ ते २० लाख रुपयांचे दंड म्हणून वसूल केले जाणारे महसुल मिळत आहे. तर दुसरीकडे दर ३ महिन्यांमध्ये २४ ते २८ हजार प्रवासी बस मधून ठरलेल्या अंतरापेक्षा जास्त, काही तिकीट न काढता तर प्रवास करत आहेत.
विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांकडून प्रवासभाडे अधिक देय असलेल्या प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट रक्कम भरण्याचे नाकारल्यास मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४६0(ह) अन्वये एक महिना पोलीस कोठडी किंवा २00 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे होऊ शकतात. बसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे हे प्रत्येकाला बंधनकारक आहे. विनातिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हा असल्याने प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान आणि मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट खरेदी करावे, तसेच तिकिटावर प्रमाणित केलेल्या अंतराएवढाच प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे वेळोवेळी करण्यात येत असले तरी फुकट्या प्रवाश्यांवर याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही.

