यंत्रमाग कामगारांच्या महत्वाच्या तीन मागण्यांबाबत १५ दिवसांत निर्णय - फडणवीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

यंत्रमाग कामगारांच्या महत्वाच्या तीन मागण्यांबाबत १५ दिवसांत निर्णय - फडणवीस

Share This
मुंबई  (प्रतिनिधी) :- यंत्रमाग कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवारी काढण्यात आलेल्या भारतीय ट्रेड युनियनच्या मोर्चाला मोठ्याप्रमाणात यश मिळाले. युनियनचे अध्यक्ष व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या या विराट मोर्चात हजारोंच्या संख्येने यंत्रमाग कामगार सहभागी झाले होते. यंत्रमाग कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीन काढण्यात आलेल्या या मोर्चात इचलकरंजी, सोलापूर, मालेगाव, भिवंडी येथील कामगार सहभागी झाले होते. दरम्यान नरसय्या आडम  यांनी कामगारांना किमान वेतन व इतर मागण्या मान्य व्हाव्या यासाठी प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याशिवाय शिष्टमंडळ आंदोलन मागे घेणार नाही असे घोषित केले.

तर या मोर्चास पाठींबा देण्यासाठी सिटूचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल कराड मोर्चास आवर्जून उपस्थित राहून त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी सांगितले, किमान वेतन हा कामगारांचा हक्क असून त्यात कुठलीही तडजोड होणे शक्य नाही. मालक नेहमीच त्याला विरोध करतात. याबाबत सर्वस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी  सांगितले. सरकार कुणाचेही असो, सरकार भांडवलदारांच्या बाजूने उभे असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना, कामगारांना अशा प्रकारचे मोर्चे, आंदोलने करावी लागतात. यासाठी कामगारांनी आता लुटूपुटू ची लढाई न लढता सक्षमपणे आरपारची लढाई लढणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
  
यानंतर दुपारी तीन वाजता आझाद मैदानात उपस्थित २० हजारांच्या वर कामगारांच्या जथ्यास संबोधित करतांना आडम मास्तर यांनी सांगितले की, आज २० हजार पेक्षा जास्त कामगार मोर्चात सहभागी झालेले असतांना मुख्यमंत्री फडणवीस यांना त्याचे कोणतेही सोयरसूतक नाही. मुख्यमंत्री आम्हाला वेळ देणार नसतील तर आम्ही मंत्रालयात घुसून आमचे हक्क पदरी पाडून घेऊ असे सांगितले. दरम्यान हा मोर्चा जिमखाना गेटवर पोहोचताच पोलिसांनी अडवत जनसमुदायाला शांत केले. पोलीस अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळातील नेत्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संपर्क केला. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळातील नेत्यांना सायंकाळी पावणेसातची वेळ देत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर आडम मास्तर व डॉ. कराड यांनी महत्वाच्या तीन आग्रही मागण्या ठेवल्या. या मागण्यांबाबत येत्या १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages