बेदरकार ड्रायव्हिंगचे प्रमाण दुपटीने वाढले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेदरकार ड्रायव्हिंगचे प्रमाण दुपटीने वाढले

Share This
मुंबई : मुंबईतील वाहतुकीला नजीकच्या भविष्यात तरी शिस्त येण्याची चिन्हे धूसर दिसू लागली आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या चार महिन्यांत बेदरकार ड्रायव्हिंगचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. या चार महिन्यांच्या अवधीत वाहतूक नियम उल्लंघनाच्या गुन्ह्यांत २४,८00ने वाढ झाली आहे. वाहनचालकांचा हा बेशिस्तपणा प्रवाशांच्या सुरक्षेपुढे प्रश्नचिन्ह उभे करू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर भन्नाट वेगाने दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या दुचाकीस्वारांना आवर घालण्यासाठी वाहतूक पोलीस विविध मोहिमा राबवतात; पण कठोर दंड आकारणी केली जात नसल्यामुळे हे दुचाकीस्वार अजूनही ताळ्यावर न आल्याचेच चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर बेदरकार ड्रायव्हिंगच्या गुन्ह्यात कठोर दंड आकारणी केली पाहिजे, असे मत तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत. चिंतनीय वाढ झालेल्या अन्य गुन्ह्यांत हेल्मेटशिवाय ड्रायव्हिंग (६४ टक्के), भरधाव ड्रायव्हिंग (३३ टक्के), ड्रायव्हिंग करताना मोबाइलचा वापर (२१ टक्के) आणि प्रवाशांना नाकारणे (५८ टक्के) या गुन्ह्यांचा समावेश आहे. वाहतूक पोलिसांकडे नोंद होणार्‍या गुन्ह्यांपेक्षा वास्तवातील गुन्ह्यांची आकडेवारी अधिक असते. ड्रंक ड्रायव्हिंगच्या गुन्ह्यात कठोर शिक्षा सुनावली जाऊ लागल्याने या गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गतवर्षीच्या सुरुवातीच्या चार महिन्यांची तुलना केली असता यंदा एप्रिलपर्यंत ड्रंक ड्रायव्हिंगच्या गुन्ह्यांत ९ टक्क्यांची घट नोंद झाली आहे. दोन हजारांचा दंड न भरल्यास पूर्ण रात्र कोठडीत काढावी लागेल, याची भीती मद्यपान करणार्‍या वाहनचालकांना आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages