धोकादायक २०० इमारतींचे वीज, पाणी जोडणी तोडली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2015

धोकादायक २०० इमारतींचे वीज, पाणी जोडणी तोडली


मुंबई  :  गेल्यावर्षी मुंबई महापालिकेने जाहिर केलेल्या ७७४ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ७७४ इमारतींपैकी सुमारे २०० इमारती पालिकेकडून पाडण्यात आल्या आहेत, २०० इमारतींतील लाईट, पाणी कापले आहे, तर उर्वरित इमारतींबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्याने तूर्तास या इमारतींबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र या इमारती अत्यंत धोकादायक असल्याने त्याबाबत न्यायालयात पालिकेतर्फे लवकरच निवेदन केले जाणार आहे. दरम्यान आठवडाभरापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या ५४२ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना इमारती खाली करण्याबाबतच्या नोटिसा महापालिकेने पाठवल्या असून पावसापूर्वी या इमारती रिकाम्या करण्यात येतील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली.


पालिकेतर्फे पावसापूर्वी जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यातील अतिधोकादायक इमारती जाहिर केल्या जातात. यंदा ५४२ इमारती अतिधोकादायक इमारतींची यादी पालिकेने जाहीर केली आहे. पावसापूर्वी अशा इमारतींतील रहिवाशांना स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने रहिवाशांना नोटिसा पाठवली आहे. मात्र पुनर्वसनाची हमी, तात्पुरते स्थलांतर इमारतीपासून जवळपास व्हावे ही मागणी पूर्ण होत नसल्याने रहिवासी सहजासहजी इमारत सोडण्यास तयार होत नाहीत. त्यामुळेच गेल्यावर्षीच्या जाहिर करण्यात आलेल्या अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रिया यंदा सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. २०० इमारतींचे वीज, पाणी जोडणी कापल्याने या इमारतींतील रहिवाशांना इमारती खाली कराव्या लागणार आहेत. यातील पालिकेच्या इमारतीतील रहिवाशांनाची स्थलांतरीत करण्याची जबाबदारी पालिकेची असते. खासगी इमारतींतील रहिवाशांनी मात्र स्थलांतर कुठे व्हायचे याबाबत त्यांनीच ठरवायचे आहे. दरम्यान, रिकाम्या करण्यात आलेल्या इमारतींतील रहिवाशांना माहुलगाव व इतरत्र स्थलांतरीत केले जाणार आहे. दरम्यान, यंदा जाहीर करण्यात आलेल्या ५४२ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना स्थलांतरीत होण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. नोटिसा पाठवूनही इमारती रिकाम्या करण्यास रहिवासी तयार झाले नाहीत, तर नियमानुसार पोलिस बळाचा वापर करून इमारती खाली केल्या जातील असे दराडे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS