मुंबई (प्रतिनिधी)- अग्निशमन विभागासारख्या अतिमहत्वाच्या विभागाबाबत पालिका नेहमीच दुर्लक्ष करते. तहान लागल्यावर विहीर खोदणाची सवय जडलेल्या पालिकेला दुर्घटनेनंतर उपाययोजनांचे जाग येते. नुकतीच काळबादेवीच्या आगीत दोन होरपळून अधिकारी मृत झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. या आगीचे झळ आज पालिका सभागृहाला बसली. यावेळी प्रशासनाने अग्निशमन दलाबाबत ठोस उपाय योजनांची माहिती देण्यासाठी आयुक्तांना पाचरण करण्यात आले. मात्र, २३ सदस्यांच्या भाषण बाकी असल्यामुळे आयुक्तांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे हैराण झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला.
मुंबईत आग लागण्याच्या घटना सतत होत असतात. आगीनंतर अग्निशमन दलाला सक्षम करण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. मात्र, कालांतराने प्रशासनाला त्याचा विसर पडतो. लोटसपार्क आगीत एक जवान व २० जवान तर काळबादेवी आगीत अग्निशमन दोन अधिकारी हुतात्मे व तीन जखमी झाले. याबाबत तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी फायर ऑडीट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या योजनांची अमंलबजावनी केली जात नसल्याचा मुददा निवेदनाद्वारे विरोधीपक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी उपस्थित केला. यानिवेदनाचे सर्वपक्षिय सदस्यांनी समर्थन केले. यावेळी अग्निशमन दलाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका आयुक्तांसह सर्व अतिरिक्त आयुक्तांवर ताशेरे ओढले. तसेच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या कामांचा अहवाल सादर करण्याची मागणी भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी उपस्थित केला. आयुक्तांनी सोमवारच्या सभेत अग्निशमन दलाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मंगळवारच्या सभेत उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. मात्र, तेही उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्यात संवेदनशिलता नाही. त्यामुळे असे पालिका आयुक्त काय कामाचे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. कॉंग्रेसचे सदस्य प्रविण छेडा म्हणाले की, कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची पध्दत पालिकेने सोडून द्यावी. निदान अग्निशमन दलाबाबत तरी जागरूकता घेण्याची सूचना त्यांनी केली. आजही अनेक प्रस्ताव डोळेझाकून मंजूर केले जात असल्याचे सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष म्हणाले की, चौकशी समिती नेमायची काम फक्त प्रशासनाकडून केले जाते. मात्र, अहवाल देण्यास कित्येक वर्षे काढली जातात. लोटसपार्कचाही अहवाल गुलदस्त्यात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सदस्यांनी अग्निशमन दलाकडे प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाबाबत टिका केली. यानंतर आयुक्तांना खुलासा करण्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र, सदस्यांची भाषणे बाकी असल्यामुळे आयुक्तांनी सभागृहातून निघून गेले. त्यामुळे विरोधकांनी आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करून सभात्याग केला.

