पालिकेची आरोग्य सेवा अतुलनीय व गौरवास्पद - आरोग्यमंत्री
मुंबई / प्रतिनिधी
वांद्रे (पूर्व) येथील बाळ गंगाधर खेर (खेरवाडी) महापालिका प्रसुतिगृहाचे लोकार्पण करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला आरोग्य सेवेच्या बाबतीत केलेल्या सेवा हया अतुलनीय व गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले. तर महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिकेकडून देण्यात येत असलेल्या आरोग्य सेवा या सामाजिक बांधिलकीतून देण्यात येत असल्याचे सांगितले.
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्याचा व्याप मोठया प्रमाणावर आहे. मुंबई शहर व उपनगरातील लोकसंख्या विचारात घेता, इतकी चांगली आरोग्य सेवा देणारी पालिका अतुलनीयच आहे.येथील लोकप्रतिनिधींनी प्रशासन व जनता यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्याची गरज आहे आणि हे लोकप्रतिनिधींकडून होत असल्याचे पाहावयास मिळते. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये सुसंवाद झाला पाहिजे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वाईन फ्लू, मलेरिया व अन्य आजारांबाबत मागील काही महिन्यांपूर्वी केलेले काम हे गौरवास पात्र आहे.मुंबईतील लोकसंख्येची घनता विचारात घेता, इतक्या जोमाने व गुणवत्तेने पालिकेच्या डॉक्टर्स व कर्मचाऱयांनी घेतलेले परिश्रम हे मोठे होते. स्वाईन फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेचा आदर्श राज्यासमोर आहे. येत्या काळात पावसाळयानंतर उद्भवणाऱया आजारांची शक्यता नजरेसमोर ठेवून अशा प्रकारच्या आजारांवर मात करण्यासाठी पालिकेने नियोजन केलेले आहे. यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही मुंबई सुदृढ व सशक्त राहण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी याप्रसंगी सांगितले की, महापालिकेच्या आरोग्य सेवेकडून करण्यात येत असलेली सेवा ही नागरी हित समोर ठेवून अविरत सुरु असते. ही सेवा अशाच जोमात व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुरु रहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला नेहमी सहकार्य व प्रोत्साहन देण्याचे काम केलेले आहे. महापालिकेची आरोग्यसेवा ही इतर खासगी रुग्णसेवेपेक्षाही दर्जात्मक व गुणवत्तात्मक असल्याचे महापौर आंबेकर यावेळी म्हणाल्या. स्थानिक नगरसेविका डॉ.गुलिस्तां शेख व सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा सुनिता यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
बाळ गंगाधर खेर प्रसुतिगृह सुमारे ५० वर्षांपासून महिलांना प्रसुतिसेवा देत असून या प्रसुतिगृहात प्रसुतिपूर्व व प्रसुतिपश्चात तपासणी, प्रसुति, शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा, सोनोग्राफ्री या सुविधांचा अंतर्भाव आहे. तसेच हे प्रसुतिगृह ३० खाटांचे असून येथील सुविधांचा लाभ विशेषकरुन भारत नगर, गांधी नगर, बेहरामपाडा, निर्मल नगर, कालिना, गोळीबार, गव्हर्मेंट कॉलनी या विभागातील महिलांना होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्या माने यांनी तर आभार डॉ. पद्मजा केसकर यांनी मानले.


